मुंबई, दि. १४: आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ साजरे करताना विविध उपक्रम राबविले जात आहेत. हे उपक्रम राबवत असताना पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण यावर अधिक भर द्यावा. सर्व उपक्रम विविध सहकारी संस्थांच्या सक्रिय सहभागातून आणि मदतीने राबवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ निमित्त विविध कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी विधानभवन येथे राज्य शिखर परिषदेच्या आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे, सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, मुख्य सचिव राजेशकुमार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार, कृषी, पणन, दुग्ध व्यवसाय, अन्न, नागरी पुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, अपारंपारिक ऊर्जा विभाग यांनी समन्वयातून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त कार्यक्रमांचे काटेकोरपणे नियोजन करावे. वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती व्यापक प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचवावी. आंतरराष्ट्रीय वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांना वृक्ष लागवडीची जोड द्यावी. सहकार पुरस्कार 2025 साठी सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचा दिनांक 18 जुलै वरून 31 जुलै करण्यात यावा असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाचे विविध उपक्रम समन्वयाने राबविण्यात यावेत. राज्यातील सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याने सहकार क्षेत्रात केलेली प्रगती आणि दिलेल्या योगदानाची माहिती राज्यातील जनतेला होण्यासाठी हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. राज्यस्तरीय शिखर समितीमार्फत वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबतची माहिती समितीस वेळोवेळी सादर करावी. सहकार क्षेत्रामधील आव्हाने बदलली असून या क्षेत्राचा अभ्यास करून सहकार कायद्याचे पुनर्विलोकन करणे गरजेचे आहे. सहकार कायद्यात कोणत्या तरतुदी असाव्यात याबाबत अभ्यासगट तयार करून, त्याचा अहवाल समितीसमोर सादर करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर लिखित ‘गोष्ट रिझर्व्ह बँकेची’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त सहकार विभागामार्फत विविध उपक्रमांच्या माहितीचे सादरीकरण केले.
प्रशासक अनास्कर यांनी अहिल्यानगर शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राबवण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती सादर केले. मुंबई आणि नागपूर येथे सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषद पार पडली. आगामी कालावधी देखील विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सहकार ध्वज यात्रा, सहकार मॅरेथॉन तसेच या सर्व उपक्रमांना वृक्ष लागवडीची जोड देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला अपर मुख्य सचिव वित्त ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, प्रधान सचिव (सहकार व पणन) प्रवीण दराडे, प्रधान सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी, प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंग, सचिव (अन्न व नागरी पुरवठा) विनिता सिंगल, सचिव (पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग) एन.रामास्वामी यासह सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था दीपक तावरे, साखर आयुक्त, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन मर्यादित प्रदेश सुहास पटवर्धन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रतिनिधी, नागरी सहकारी बँक प्रतिनिधी, सहकारी साखर कारखाना प्रतिनिधी उपस्थित होते.
०००
संध्या गरवारे/विसंअ/