धुळे, दि. १२ (जिमाका): पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सबलीकरण आदी क्षेत्रांतील प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट प्रतिबिंब दिसेल असे नियोजन करुन विकास कामे करावीत. असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक पार पडली, यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते.

या बैठकीस खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार काशिराम पावरा, मंजुळा गावित, राघवेंद्र पाटील, पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी (ई-उपस्थिती), जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, जिल्हा नियोजन अधिकारी संतोष वानखडे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संजय सैंदाणे, यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, “विकासकामे ही केवळ कागदावर न राहता रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सक्षमीकरण आदी क्षेत्रांतील प्राधान्यक्रम ठरवून कामांचे प्रभावी नियोजन करण्यात यावे. जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशाच विकासात्मक कामांना व योजनांना प्राधान्य देण्यात यावे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गुणवत्ता राखून विकासकामे पूर्ण करावीत. यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनपूर्वक आणि समन्वयाने कामे करावे. सिव्हिल हॉस्पिटल ते हिरे महाविद्यालयात रूग्णांसाठी बससेवा उपलब्ध करून द्यावी. तालुका क्रीडा संकुलसाठी जागा शोधावी, हिरे वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती नागरिकांना देण्यासाठी जनजागृती करणे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या 12 गावासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करावा, महावितरणकडून बसविलेले नादुरुस्त मीटर बदलण्यात यावेत. सर्व शासकीय कार्यालयात सौर उर्जेचा वापर वाढवावा. धुळे शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी नियोजन करावे, महिला भवनात बचतगटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तु विक्री करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिला मॉल तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन महिला मॉल तयार करावेत.
जिल्ह्यातील सर्व शाळांची दुरुस्ती करण्यात यावी. दुर्गम भागातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह ज्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक आहे अशा ठिकाणी जास्त शिक्षकांची नेमणूक करावी. सामाजिक न्याय भवनात अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्याबाबत प्रस्ताव द्यावा, दोंडाईचा शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसवावे. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नाविण्यपूर्ण योजना सुचवून त्या राबविण्यात याव्यात. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात पशुधन वाढीसाठी नियोजन करून योजना राबवावी, महानगरपालिका आणि नगरपालिकेने मच्छिमारांना मासे विक्रीसाठी निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, पारंपरिक मच्छीमारांची प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे, माशांचे संवर्धन करण्याबरोबरच त्या माशांची प्रजाती वाढविण्यासाठी प्रयत्न करुन मत्स्यपालन व्यवसायाला चालना द्यावी. जिल्हा वार्षिक योजनेत देण्यात येणाऱ्या निधीतून गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा, जिल्ह्यातील विकासाचे नियोजन करताना लोकप्रतनिधीनींच्या सूचना लक्षात घ्याव्यात. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळाचे संवर्धनासाठी विकसित करण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री रावल यांनी दिल्या.
बैठकीत 1 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन 2024-2025 मध्ये झालेल्या खर्चास मान्यता देणे, तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 वर्षांतील 30 जून अखेर खर्चास मान्यता देण्यात आली.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्य आयुक्त, समाज कल्याण, धुळे कार्यालयाने तयार केलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या महत्वपूर्ण योजना घडीपुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
‘विकसित महाराष्ट्र 2047′ सर्वेक्षणामध्ये धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपले मत नोंदवावे – पालकमंत्री रावल
विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करत आहे. यात राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा तयार करताना सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा व आकांक्षा देखील प्रतिबिंबित व्हाव्यात या हेतूने त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नागरी सर्वेक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणामार्फत राहणीमानाचा दर्जा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेच्या संधी या महत्त्वाच्या मुद्यांवर नागरिकांचे विचार जाणून घेण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यूआर कोड वरुन व्हॉटस्अप चॅटबॉटद्वारे आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी यावेळी केले.
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण – पालकमंत्री
संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
०००