मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६ करिता नावे सुचविण्यासाठी शिफारस समितीचे सदस्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, उपसचिव हेमंत डांगे, अवर सचिव शिल्पा देशपांडे, कक्ष अधिकारी अजय साखरे उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींना पद्म पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात येणाऱ्या प्रस्तावांची छाननी करण्यात आली. यामध्ये सामाजिक कार्य, कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, वैद्यकीय सेवा, क्रीडा, प्रशासन, उद्योग, पर्यावरण आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसंदर्भात विचार करण्यात आला. दर्जेदार आणि खऱ्या अर्थाने प्रेरणादायी काम करणाऱ्या व्यक्तींचीच शिफारस व्हावी, यावर समिती सदस्यांनी सहमती दर्शविली.
पद्म पुरस्कार हे देशातील महत्वाच्या नागरी सन्मानांपैकी एक असून, त्यासाठी शिफारस करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची खातरजमा करूनच त्यांची नावे अंतिम यादीत घेतली जावी, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्राकडे शिफारस करताना आलेल्या प्रस्तावांचा, अर्जाचा, निवेदनाची योग्य तपासणी करावी, तसेच ज्यांचे कार्य समाजोपयोगी, प्रेरणादायी व दीर्घकाळपर्यंत परिणामकारक आहे, अशाच व्यक्तींच्या नावांची शिफारस केंद्राकडे समितीमार्फत जावी, असे निर्देश दिले.
0000
बी.सी.झंवर/विसंअ/