मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित ठेकेदार आणि महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या खात्यात जमा होणाऱ्या वेतनातील रक्कम दुसऱ्याने काढल्यास, तो प्रकार फौजदारी गुन्हा मानला जाईल आणि दोषींवर कडक फौजदारी कारवाई केली जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून कामगारांचे वेतन थेट व सुरक्षितपणे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
००००
शैलजा पाटील/विसंअ/