विद्यार्थी नात्याने नवीन विषयांचा प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे – सरन्यायाधीश भूषण गवई

मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने गौरव समारंभ

मुंबई दि ०५:  विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्याने प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

हॉटेल ताज महल पॅलेस येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव समारंभ पार पडला. यावेळी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य  न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व तेजस्विनी गवई हे उपस्थित होते. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयातील लाईव्ह स्ट्रीमिंग प्रणाली तसेच वाय फाय सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

सरन्यायाधीश गवई म्हणाले, प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात काम करताना तळमळीने आणि सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे. नव्या पिढीतील सहकाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोनाने प्रेरित करणे आणि त्यांच्यातील अंगभूत गुणांना अधिक सक्षम करणे हे वरिष्ठांचे कर्तव्य आहे. याबरोबरच काम आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या यामध्ये संतुलन राखणेही गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने नव्याने उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक सुविधा नागरिकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील, असा विश्वास सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केला.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी मनोगतात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कारकीर्दीचा गौरव केला.

०००