मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth Level Officers – BLO) यांनी दिलेली पहिली भेट पूर्ण झाली आहे. दिनांक २४ जून २०२५ रोजी बिहारमधील ७.९० कोटी मतदारांपैकी ८७ टक्के म्हणजेच ६,८६,१७,९३२ गणना फॉर्म वितरित करण्यात आले आहेत.
घरे बंद असणे, नागरिक प्रवासात असणे, स्थलांतरित कुटुंबे किंवा मृत मतदार अशा काही कारणांमुळे अद्यापही काही घरी बीएलओ पोहोचू शकलेले नाहीत. तेथे बीएलओ प्रत्येकी तीन वेळा भेटी देतील, त्यामुळे वितरित फॉर्मची संख्या पुढील काळात वाढण्याची अपेक्षा आहे.
गणना फॉर्म ऑनलाईन देखील उपलब्ध असून भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://voters.eci.gov.in आणि ECINET App वर अंशतः भरलेले फॉर्म डाऊनलोड करता येतात. मतदार स्वतःही भरलेले फॉर्म ECINET App वर अपलोड करू शकतात.
राजकीय पक्षांकडूनही सक्रिय सहभाग मिळत असून राज्यात १,५४,९७७ बूथ स्तर एजंट्स (Booth Level Agents – BLAs) विविध राजकीय पक्षांकडून नेमले गेले आहेत. २ जुलै २०२५ रोजीपर्यंत भाजपकडून सर्वाधिक ५२,६८९ एजंट्स नेमले गेले आहेत. त्यानंतर RJD (४७,५०४), JD(U) (३४,६६९), काँग्रेस (१६,५००) यांचा क्रमांक लागतो. इतर पक्षांनीही BLAs नेमले असून, प्रत्येक एजंट दररोज ५० प्रमाणित फॉर्म सादर करू शकतो.
सध्या बीएलओंकडे सुमारे ५ टक्के म्हणजेच ३८ लाख भरलेले व स्वाक्षरीयुक्त फॉर्म जमा झाले आहेत. आयोगाने वेळोवेळी ‘प्रथम समावेश’ या घोषवाक्यावर भर दिला असून, या उपक्रमाचा उद्देश राज्यातील सर्व पात्र नागरिकांना मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करणे हा आहे.
जो कोणी १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित होणाऱ्या मसुदा मतदारयादीत आपले नाव समाविष्ट करू इच्छितो, त्याने २५ जुलै २०२५ पर्यंत स्वाक्षरीयुक्त गणना फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.
२ ऑगस्टपासून यादीतील नावांची पडताळणी मोठ्या प्रमाणावर सुरू केली जाईल. या मसुद्यावर कोणतीही हरकत किंवा दावा २ ऑगस्टपासून कोणताही राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिकाला दाखल करता येईल.
अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील सादर करता येईल, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
०००
संजय ओरके/वि.स.अं.