छत्रपती संभाजीनगर, दि. 3 (विमाका) :- विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्राधिकरणाच्या विविध क्षेत्रामध्ये नियोजनाच्या दृष्टीकोनातून करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करून संबंधित यंत्रणेला याबाबतची कार्यवाही विहित कालमर्यादेत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीवेळी महानगर नियोजनकार हर्षल बावीसकर, नगर प्रशासन विभागाचे उपायुक्त देविदास टेकाळे, सह महानियोजनकार रवींद्र जायभाय, तहसीलदार सुनंदा पारवे, उपमुख्यलेखाधिकारी व वित्त अधिकारी साधना बांगर, सहायक संचालक सुमित मोरावकर यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री.पापळकर म्हणाले, औद्योगिक व वाणिज्य वापर सुरू असलेल्या प्रदेशात दिवसेंदिवस वाढणारे अतिक्रमण रोखण्यासाठी पथक स्थापन करावे. स्थापन केलेल्या पथकाने क्षेत्रीय दौरे करून अतिक्रमण धारकांना कायद्यातील तरतूदीनुसार नोटीसा बजावून केलेल्या कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल सादर करावा. तसेच प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमीनींची नियमितपणे स्थळ पाहणी करून या जमिनीवरील अतिक्रमण, अवैध उत्खनन, सांडपाणी, घनकचरा इत्यादीबाबत प्रतिबंधात्मक व दंडात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महानगर आयुक्त श्री.पापळकर यांनी प्राधिकरणाच्या विभागनिहाय विविध मुद्यांवर चर्चा करून विहित मुदतीत कार्यवाही करा अशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या. नियोजन, अतिक्रमण, जमीन मालमत्ता, तसेच आस्थापना विभागाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****