अक्कलकुवा तालुक्यात केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय

विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षित मार्ग

मुंबई, दि. २: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ठाण्याविहिर पाडा ते केलखाडी पाडा दरम्यान केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सुरक्षित व कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध होणार आहे.

हा अवर्गीकृत रस्ता ठाण्याविहिर पाड्यापासून केलखाडी पाड्यापर्यंत ५ कि.मी.चा आहे. या मार्गामध्ये केलखाडी पाड्याजवळ केलखाडी नदी येते. पाड्यापासून १ कि.मी.वर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी दररोज नदी ओलांडून शिक्षणासाठी जात असतात. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत होता. हे लक्षात घेऊन प्रशासनाने या ठिकाणी १५ मीटर लांबीचा साकव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी अंदाजे ४० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या साकवाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया जलद गतीने राबवून काम तत्काळ सुरू करण्यात येत आहे.

या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास सुरक्षित आणि सहज मार्ग उपलब्ध होईल तसेच पालकांनाही दिलासा मिळेल. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर सामान्य ग्रामस्थांसाठीही हा साकव अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हा साकव शिक्षण, आरोग्य सेवा आणि दळणवळणाच्या दृष्टीने मोठा बदल घडवून आणेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००