मुंबई, दि. ०२ : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ देऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे कृषिमंत्री अॅड. कोकाटे यांनी सांगितले.
हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ३० जून २०२५ होती, मात्र २७ जून २०२५ पासून संकेतस्थळाबाबत समस्या असल्याने विमा अर्ज करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांकडून येत होत्या. याबाबत केंद्र सरकारशी योग्यवेळी समन्वय साधल्याने एकूणच परिस्थितीचा विचार करून दिनांक ३ ते ६ जुलै २०२५ असे एकूण चार दिवस वरील पिकांकरिता मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या www.pmfby.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन विमा योजनेचा अर्ज करावा, असे आवाहन कृषिमंत्री अॅड. कोकाटे यांनी केले आहे.
०००
संध्या गरवारे/विसंअ