मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शुभारंभ १२ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण देशभर एकाच दिवशी होणार असून, या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली.
आज दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी सर्व राज्यांचे क्रीडा मंत्री व सचिवांशी संवाद साधला. या बैठकीस महाराष्ट्राचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देशातील युवकांना विकसित भारत अभियानात जास्तीत जास्त सहभाग वाढवावा, विविध उपक्रमांद्वारे त्यांची सामाजिक जाणीव वाढावी, तसेच क्रीडा क्षेत्रात त्यांची रुची वाढावी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. प्रत्येक विद्यापिठांअंतर्गत एक महाविद्यालय निवडून तिथे कार्यक्रम राबवावा, यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, अशा सूचना केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय यांनी दिल्या.
युवकांमध्ये क्रीडा, सामाजिक, आर्थिक, आरोग्य व राजकीय जाणीव निर्माण करण्यासाठी विविध विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहनही केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय यांनी केले. यामुळे विकसित भारत घडवण्याच्या दिशेने युवकांची सशक्त भूमिका ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘युवा संसद’, वादविवाद स्पर्धा, युवा संवाद, क्रीडा स्पर्धा, जनजागृती मोहीम अशा विविध उपक्रमांची रूपरेषा आखण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे कार्यक्रम नियोजनबद्धरित्या राबविण्यात येणार आहेत.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/