पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
श्री. शिंदे म्हणाले, खगोलशास्त्रज्ञ, लेखक असलेले डॉ. नारळीकर हे खऱ्याअर्थाने देशाचा गौरव, भुषण होते, ते देशाची संपत्ती होते. त्यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यासारखी माणसे दुर्मिळ असतात, त्यांच्या कार्यातून नवीन पिढीला निरंतर ऊर्जा, प्रेरणा मिळाली पाहिजे, याकरिता त्यांच्या नावाला साजेचे कार्य राज्यशासनाच्यावतीने करण्यात येईल,
डॉ. जयंत नारळीकर यांना पद्मभूषण, पद्मविभुषण, महाराष्ट्र भुषण अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. खगोलशास्त्राचे ज्ञान अतिशय सोप्या भाषेत पोहचविण्याचे काम त्यांनी केले, हिमालयाऐवढे कर्तृत्व असलेले व्यक्तिमत्व, उच्च विचारसरणी असतानादेखील साधा स्वभाव होता, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, डॉ. नारळीकर यांच्या मुली गीता नारळीकर आणि लिलावती नारळीकर, जावई अलोक श्रीवास्तव, हरी चक्रवर्ती उपस्थित होते.
0000