नाशिक, दि. 23 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा): राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दुपारी मुंडेगाव, ता. इगतपुरी येथील जिंदाल पॉलिफिल्म या कंपनीला भेट देऊन पाहणी केली.
जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला दोन दिवसांपूर्वी लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. भुसे यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. तसेच सुरक्षेबाबत सूचना केल्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार, तहसीलदार अभिजित बारावकर उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की, आग विझविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, तर पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात येतील. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आगीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशाही सूचना त्यांनी केल्या. उपविभागीय अधिकारी श्री. पवार यांनी जिंदाल कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
०००००