तालुका फळरोपवाटिकेत उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची लागवड करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. २३: कन्हेरी तालुका फळरोप वाटिकेमध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक कलमे उपलब्ध होईल, यादृष्टीने उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांच्या रोपांची लागवड करावी तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत रोपे, कलमांच्या विक्रीमध्ये वाढ करण्याकरीता प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन उद्यान, कन्हेरी शिवसृष्टी, महाराष्ट्र परिवहन महामंडळ कार्यशाळा येथील विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

तालुका फळरोप वाटिका कार्यालयाच्या छतावरील सोलर पॅनलचे परिसरातील नवीन होणाऱ्या वाहनतळाच्या छतावर (पार्किग शेड) स्थलांतर करावे. प्रक्षेत्रावर शिल्लक राहिलेल्या मोकळ्या जागेत नारळाच्या कलमांची लागवड करावी. फळबाग लागवडीकरीता प्रक्षेत्राचे सपाटीकरण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

शिवसृष्टी प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार असून सद्यस्थितीत पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर भव्यतेने प्रदर्शित होईल यादृष्टीने प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून बारामतीच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी.

कन्हेरी वनउद्यान परिसरामध्ये वड, उंबर, पिंपळ, पिंपरण, करंज, कडूनिंब आदी स्थानिक प्रजातीच्या रोपांची लागवड करावी. वनउद्यानात असलेल्या तळाच्या काठावर गवत प्रजाती (वाघनखे) लावावीत. उन्हाळ्यात सावली देणारी उंच वाढणारी अधिकाधिक वृक्षांची लागवड करावी.

परिवहन महामंडळ कार्यशाळेची कामे करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. तसेच कामकाजाच्या अनुषंगाने त्यांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. परिसरातील जागेचे नीटपणे सपाटीकरण करुन घ्यावे, संरक्षण भितींचे आरेखन बस आगाराप्रमाणे करावे. तालुक्यातील विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी  हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, सहायक वनसंरक्षक अतुल जैनक, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी आश्विनी शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बारामती आगार प्रमुख रवीराज घोगरे आदी उपस्थित होते.

०००