नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी तातडीने निकाली काढा – पालकमंत्री संजय राठोड

  • विश्रामभवन येथे पालकमंत्र्यांचे समाधान शिबिर
  • तक्रारी जाणून घेत नागरिकांशी साधला संवाद

यवतमाळ, दि.22 (जिमाका) : आपल्या तक्रारी निकाली निघतील, आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेणे नागरिक विविध शासकीय कार्यालयांसह पालकमंत्री कार्यालयाकडे तक्रारी, विनंती, निवेदने सादर करत असतात. यावर वेळीच कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या ज्या कार्यालयांकडे तक्रारी, निवेदने प्रलंबित असतील त्यांनी त्या तातडीने निकाली काढाव्या, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

पालकमंत्री कार्यालयाकडे ऑनलाईन दाखल झालेल्या परंतू विभागांद्वारे त्यावर योग्य कार्यवाही न झालेल्या तक्रारी, निवेदनांवर पालकमंत्र्यांनी तक्रारदारांसमक्ष विभागांसोबत चर्चा करून योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्र्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री.दरोळी, यवतमाळ सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता योगेश सोनवणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी जवळजवळ 50 तक्रारदार, निवेदनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या तक्रारी समजून घेतल्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारींवर चर्चा होऊन वेळेत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नवीन पाझर तलाव, अस्तित्वातील तलावातील गाळ काढणे व खोलिकरण, यवतमाळ नगर परिषदेच्या ताब्यात असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या वस्तुंचे वस्तुसंग्रहालय उभारणे, अतिक्रमन नियमानुकुल करणे, वहिवाटीसाठी पक्का पुल, कर्ज प्रकरणे, लाडकी बहीण योजनेचा लाभ, वृद्ध कलावंतांना मानधन, भुसंपादन मोबदला, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत हप्ता वितरण आदी विषयांवरील तक्रारींवर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

काही जनांच्या नियुक्ती व सेवाविषयक तक्रारी होत्या. त्या तक्रारींवर कायदेशीर बाबी तपासून कारवाई करावी, असे पालकमंत्री म्हणाले. पालकमंत्री कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी, निवेदने संबंधित विभागांना कारवाईसाठी पाठविण्यात येतात. त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. पालकमंत्री कार्यालयासह लोकप्रतिनिधींकडून प्राप्त तक्रारींची स्वतंत्र नोंदवही ठेवावी, असे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिले.

000