शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २१ : अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल करण्यात आलेला नाही. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहचविण्यासाठी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात विविध शिष्यवृत्तींबाबत व शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्याबाबत आढावा बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, उपसचिव समीर सावंत, शिक्षण संचालनालयाचे (योजना) संचालक महेश पालकर व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, सध्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीमध्ये व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीमध्ये घेण्याचा मानस आहे. या बदलामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकेल व त्यांचे पुढील शिक्षण सुलभ होईल. पुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. या कामाला गती देण्यात यावी. जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यासाठी संबंधित विभागांनी सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, मार्गदर्शन व विविध प्रकारची मदत दिली जाते. इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही अशीच मदत करण्याबाबत प्रस्ताव संबंधित विभागाने सादर करावा, असेही शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

0000

मोहिनी राणे/ससं/