‘बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ पुस्तिका उपयुक्त ठरतेय – आयुक्त कैलास पगारे

मुंबई, दि. १९ : गरोदर माता व सहा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभागाच्या ‘एकात्मिक बालविकास सेवा योजने’अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली ‘बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ ही मार्गदर्शक पुस्तिका पालकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे आयुक्त कैलास पगारे यांनी व्यक्त सांगितले.

जागतिक महिला दिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बालकांच्या कुपोषणाच्या समस्येवर मात करणे, बालमृत्यू दरात घट आणि बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्त्वाचे असतात. या कालावधीत गरोदर मातांनी स्वतःची योग्य काळजी कशी घ्यावी, बाळाच्या मानसिक आणि भावनिक गरजा कशा पूर्ण कराव्यात, यासंदर्भात तज्ञांच्या मदतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

“मूल ही केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. बालपणापासून योग्य संगोपन झाले, तर देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत होतो,” असेही श्री.पगारे यांनी सांगितले.

पुस्तिकेच्या मलपृष्ठावर ‘माता-बाल संगोपन कार्ड’ आणि लसीकरणाबाबतची माहिती देणारा QR कोड देण्यात आला आहे. यामुळे पालकांना वेळेवर लसीकरणाची माहिती मिळू शकते. या QR कोडच्या साहाय्याने शासनाच्या योजनांची माहितीही मिळू शकते.

गरोदर स्त्रियांचे आरोग्य, पोषण, पूरक आहार, बालकांची वाढ आणि विकास याविषयी संक्षिप्त व उपयुक्त माहिती या पुस्तिकेत देण्यात आली असून, बालकांची सशक्त पिढी घडवण्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास पगारे यांनी व्यक्त केला.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/