नागपूर, दि. 19 : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विभागातील धरणे आणि तलावांतील पाण्याची पातळी कमी करा, शहरातील होर्डिंग्ज व बॅनरची स्थिती तपासून घ्या, जनतेला वेळेत माहिती पुरविण्याकरिता डीडीएमए चॅटबॉटचा वापर करा, जलाशय व धरणाच्या ठिकाणी पर्यटकांचे अपघात होणार नाही यासाठी उचित काळजी घ्या आणि साथीचे रोग पसरणार नाही याची काळजी घेवून उचित आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागाची मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आर. बालसुब्रमण्यम, आयुक्तालयातील महसूल विभागाचे अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जलसंपदा, पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दूरदृष्यप्रणालीद्वारे वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
यावर्षी हवामान विभागाने विदर्भात वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तविला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी चोख भूमिका बजावत मनुष्य व प्राणीहानी होणार नाही व वेळेत नागरिकांना मदत पोचविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिले.
गोसेखुर्द, अपर वर्धा, ईसापूर आदी धरणांसह राज्याच्या सीमेलगत संजय सरोवर आणि मेडिकट्टा धरणातील पाणी पातळी कमी करण्यात यावी अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विभागात एकूण 16 मोठे धरण, 42 मध्यम तर 320 लघु असे एकूण 378 धरण असून पुर नियंत्रणाच्यादृष्टीने त्यांची पाणी पातळी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील धोकादायक होर्डिंग्ज व बॅनर ची तपासणी करून ते वेळीच काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुर परिस्थिती व अतीवृष्टी झाल्यास त्याची माहिती वेळीच नागरिकांना देण्याच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्याने तयार केलेले डीडीएमए चॅटबॉट, साथीदार ॲप अन्य जिल्ह्यांनीही तयार करावे व त्याचा वापर करावा तसेच केंद्रिय जल आयोगाचे फ्लडवॉच ॲप या अधिकृत ॲप प्रमाणे अन्य शासकीय ॲपचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील गर्भवती महिलांना आधीच सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात यावे, गेल्या पाच ते दहा वर्षात जलाशय व धरणांच्या ठिकाणी पर्यटकांचा अपघात असेल अश्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, मान्सूनमधील साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी अशा सूचनाही श्रीमती बिदरी यांनी यंत्रणांना दिल्या
प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर मनपा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जलसंपदा विभाग, हवाई दल, सशस्त्र दल, केंद्रिय जल आयोग, आरोग्य विभाग यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मान्सून मधील अतिवृष्टीचा सामना करण्याकरिता केलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.
00000