सर्व सामन्यांच्या कामांना तात्काळ प्राधान्य द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर, दि. 18:- ज्या संवेदनेने शासन तळागाळातील सर्वसामान्यांपासून समाजातील सर्व घटकासाठी योजना आखते, शासन निर्णय काढते, लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मदतीसाठी तत्पर राहते ती तत्परता प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्ययास आली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्या त्या स्थानिक पातळीवर, संबंधित कार्यालयाद्वारे त्वरीत मार्गी लागली तर जनसंवादाला लोकांना यायची वेळ पडणार नाही या शब्दात महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या उद्वीग्न भावना व्यक्त केल्या.                                                                                            शासन स्तरावरील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत या उद्देशाने नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

लोकांची कामे तात्काळ व्हावी ही अपेक्षा चुकीची नाही. प्रत्येक नागरिकांचे शासनाशी सदैव काम पडते असेही नाही. अनेक शेतकरी नैसर्गिक आव्हानाशी तोंड देत झालेले नुकसान त्याला सोसता यावे. यात काही मदत मिळावी म्हणून शासनाकडे येतात. तहसील कार्यालयाशी संपर्क साधतात. नियमात असणारी कामे तात्काळ मार्गी लागलीच पाहिजेत. यात दिरंगाई होता काम नये असे त्यांनी सांगितले. जनसंवादात आलेली निवेदने ज्या अधिकारी व कार्यालयांना निर्देशित केली आहेत त्याबाबत संबंधितांनी पुन्हा विचारणा केल्यास कठोर कार्यवाही करू असे ते म्हणाले.

या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी पांदन रस्ते, शेतजमिनीवरील अतिक्रमण, घरकुल योजना, पाणी समस्या, आरोग्य ,समस्या, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक व महसूल संबंधित अशा अनेक विषयांवर निवेदने देवून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधला.

00000