एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी केली भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी

नागपूर, ता. १७ –  शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या प्रकल्पाची आज शनिवारी (१७ मे) पाहणी केली.


यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी,  उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, स्वच्छता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डा. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सोनम देशमुख, सुसबिडीच्या श्रीमती वृंदा ठाकूर, प्रकल्प संचालक संजय गदरे, वित्तीय संचालक श्री विनोद टंडन, नागपूर प्रकल्प प्रमुख नितीन पटवर्धन, सल्लागार राजेंद्र जगताप व माजी नगरसेवक बाल्या बोरकर आणि दीपक वाडिभस्मे उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले तसेच त्यांना  प्रकल्पाची माहिती दिली. कंपनीतर्फे ३० एकर जागेवर बांधकाम  करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे १००० मे. टन प्रतिदिन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाईन, फायनान्स, बांधणी, स्वमालकी, वापर आणि हस्तांतरण (DFBOOT) या धर्तीवर उभारला जात आहे.
यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.  या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकरिता
M/s. SusBDe  नागपूर महानगरपालिकेकडून कुठलेही टिपिंग शुल्क न घेता स्वखर्चाने प्रकल्पाची उभारणी करत आहे.
या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, सेंद्रिय खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून, त्याची विक्री करण्याचे अधिकार M/s. SusBDe यांना देण्यात आले आहेत.  सदर प्रकल्प हा नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून, Dry Fermantation Technology वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे. पूर्ण क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारी कालावधी मध्ये या ३० एकर जागेव्यतिरिक्त 9 एकर जागा Fresh Waste Prossessing साठी सुद्धा देण्यात आलेली आहे. सध्या या जागेवर पायलट प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे.
या केंद्राची सुद्धा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पाहणी केली.

०००