युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

येत्या काळात लोहगाव आणि वडगावशेरी परिसरात कौशल्यवर्धन केंद्र उभारणार

पुणे, दि.१७: रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. येत्या काळात लोहगाव आणि वडगावशेरी परिसरात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ययुक्त शिक्षण मिळण्याकरीता कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टाटा ग्रुप, नगरविकास विकास, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, सीओईपी टेक विद्यापीठाचे कुलगुरू सुनील जी. भिरुड, टाटा टेक्नॉलॉजीसचे कौशल्य विभागाचे प्रमुख सुशीलकुमार, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आदी उपस्थित होते.

राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यावर भर

श्री. पवार म्हणाले, औद्यागिक प्रशिक्षणाला काळानुरुप अत्याधुनिक बनविण्याची गरज होती, कृत्रिम बुद्धीमत्तासारखे अत्याधुनिक प्रशिक्षण युवकांना मिळाले पाहिजे, यादृष्टीने टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून राज्यात चंद्रपूर, गडचिरोली येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कौशल्यवर्धन केंद्राकरिता टाटाने २४० कोटी रुपये आणि राज्य शासनाने ४० कोटी रुपये तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापिठातील केंद्राकरीता टाटाकडून १४५ कोटी रुपये आणि राज्य शासनाकडून ३० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच कल्याण डोंबिवली, रत्नागिरी, पुणे, शिर्डी, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही कामे सुरु आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत

श्री. पवार पुढे म्हणाले, पुणे शहर ही शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. अलीकडील काळात पिंपरी-चिंचवडमुळे पुणे शहरालादेखील औद्यागिक नगरी अशी ओळख मिळाली आहे. पुण्यासहित परिसराचा औद्योगिक विकास होताना आयटी पार्कसारख्या संस्था स्थापना झाल्या आहेत. उद्योग आणि आयटी पार्कमध्ये कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज विचारात घेता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडमार्फत संचालित बाणेर येथील कौशल्यवर्धन केंद्रातून युवकांची रोजगारक्षम पिढी निर्माण करणारे अत्याधुनिक, तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. उद्योगाधंद्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याचे प्रात्याक्षिकही दिले जाणार आहे. यामुळे युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार तसेच औद्यगिक क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी

या प्रकल्पाअंतर्गत सर्व यंत्रसामुग्री, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधने आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर व इतर सर्व वस्तूंचे हस्तांतरण पुणे महानगरपालिकेस करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पीईबी इमारत माहे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी. सर्व सुविधांनी युक्त आराखडा तयार करुन त्याप्रमाणे कामे दर्जेदार पद्धतीने गतीने पूर्ण करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात विविध सार्वजनिक विकासकामे सुरु असून अधिकाऱ्यांनी समर्पण भावनेने काम करावे, तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

कौशल्यवर्धन केंद्राच्या माध्यमातून ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट-डॉ. राजेंद्र भोसले

पुणे शहरातील विद्यार्थ्यांसोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कौशल्यवर्धन केंद्रातून दरवर्षी सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये २७९ कोटी ६७ लाख इतकी असून या रक्कमेपैकी रुपये २३७ कोटी ७२ लाख रुपये इतकी रक्कम टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याकडून तर उर्वरित खर्च रुपये ४१ कोटी ९५ लाख रुपये नगर विकास विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून सुमारे १ एकर (३ हजार ६०५ चौ.मी.) जागा उपलब्ध देण्यात आली असून त्यामध्ये सुमारे २२ हजार चौरस फूट क्षेत्रफळात इमारत उभारण्यात येणार आहे. या केंद्राचा नवउद्योजक, स्टार्टअप यांच्यासोबत लाखो युवकांना लाभ होणार आहे, असे प्रास्ताविकात  डॉ. भोसले म्हणाले.

000