“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १६: भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत ०९ जून २०२५ पासून सुरू होत आहे.

या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी IRCTC च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. ५ दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.

या प्रेरणादायी यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा चालवावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे”, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

या उपक्रमासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वाल, वरीष्ठ व्यवस्थापक श्री. संजय ढेकणे तसेच सर्व संबंधित अधिकारी समन्वय साधत परीश्रम करीत असून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहे, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी सांगितले आहे.

🔶 सहल तपशील –

            सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट

            शुभारंभ दिनांक: ०९ जून २०२५

            कालावधी: ५ दिवस / ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)

            प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई

            प्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादर, ठाणे

🚆 यात्रेचा प्रवासमार्ग –

मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

 

🏰 प्रमुख स्थळांची माहिती –

            रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.

            लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.

            कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.

            शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.

            भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.

            प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.

            कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर

            पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

 

💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): –

उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3AC), सुपीरियर (2AC) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे.  सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती IRCTC च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

 

✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: –

            भारत गौरव ट्रेनने प्रवास (SL / 3AC / 2AC)

            AC / Non-AC हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था

            सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड

            ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन

            प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)

            सुरक्षा व्यवस्था.

 

❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: –

            साहसी खेळ, बोटिंग इत्यादी.

            खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.

            इतर कोणताही वैयक्तिक खर्च.

            कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

 

🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): –

            पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.

            दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).

            तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.

            चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.

            पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.

            सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

 

📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संपर्क: –

IRCTC वेबसाईट: www.irctctourism.com

00000

संध्या गरवारे/विसंअ/