मुंबई, दि. १५ : आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.
आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आदिवासी विभागाकडील योजनांचा आढावा घेतला. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागाच्या आयुक्त लीना बनसोड तसेच इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. वुईके म्हणाले, आदिवासी महिलांचे सक्षमीकरण होणे गरजेचे असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र महिला बचत गट तयार करण्यात यावेत. ज्या गटांमध्ये आदिवासी महिलांचा सहभाग अधिक आहे, अशा गटांना योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांना मंजुरी देण्यात आली असून या योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी शबरी आदिवासी महामंडळात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
येत्या १६ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असून पहिल्या दिवशी शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. त्यासाठी आश्रमशाळानिहाय अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात यावी. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी पालक अधिकारी नियुक्त करावेत, तसेच १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांना व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यासाठी विशेष योजना राबवण्यात यावी, असेही मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी सांगितले.
मंत्री डॉ. वुईके म्हणाले, शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून हेल्थ कार्ड तयार करण्यात यावे. तसेच वसतिगृह समित्यांची स्थापना करून व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना पूर्णपणे पारदर्शकता पाळावी, अशा सूचना मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी दिल्या.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/