मुंबई, दि. १५: आदिवासी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने शासनस्तरावरुन विविध योजना राबवल्या जातात. त्यांची व्यापक आणि प्रभावी अमंलबजावणी करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीच्या उद्देशाने विभागाने भरीव काम करावे, अशा सूचना आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिल्या.
मंत्रालयात आयोजित आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री नाईक यांनी संबंधितांना सूचित केले. बैठकीस विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लिना बनसोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री नाईक यांनी सूचित केले की, आदिवासी विकासासाठी उत्तम काम करण्याची संधी असलेल्या या विभागाशी संबंधित सर्वांनी गांभीर्याने काम करुन उत्तम कामगिरीच्या माध्यमातून विभागासाठी आणि आदिवासींच्या प्रगती करीता भरीव योगदान द्यावे. आदिवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विभागाने अधिक प्रयत्न करावे जेणेकरुन शिक्षणाची संधी ते विद्यार्थी घेऊ शकतील. शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्याची खबरदारी घ्यावी. गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठीचे विविध उपक्रम राबवण्यास प्राधान्य द्यावे. अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणीक संधी उपलब्ध करून द्यावी. आश्रमशाळा मध्ये पिण्याचे पाणी, प्रसाधन गृहांची व्यवस्था उत्तम ठेवावी.
आदिवासी विद्यार्थ्यांना भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या सुरक्षित, पूरक वातावरण निर्माण करावे. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात यावे, यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत. त्याचप्रमाणे आदिवासींच्या स्थानिक कलाकौशल्य, संस्कृतीचा प्रसार प्रचार होण्याच्याकरिता व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी विभागाने उपक्रम राबवावेत. यासाठी शबरी महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या सूचना राज्यमंत्री नाईक यांनी यावेळी केल्या.
बैठकीत ॲडव्हान्स लर्निंग मॅनजेमेंट, नमो आदिवासी स्मार्ट योजना, करिअर गाईडन्स उपक्रम, सन्मान पोर्टल, आदिवासी आश्रम शाळा, परदेशी शिष्यवृत्ती, वन धन योजना, शबरी महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ यांसह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
आयुक्त श्रीमती बनसोड यांनी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजना, उपक्रमांबाबत सादरीकरण केले.
०००
वंदना थोरात/विसंअ/