- पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली बदल्यांची कार्यवाही
- इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी झाले खूश!
पुणे, दि. १५: पुन्हा एकदा इतिहास घडविताना या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार होतेयं याचा मला अतिशय आनंद होत आहे. अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून भ्रष्टाचारमुक्त धोरण राबविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतला. हा निर्णय भविष्यातही कायम राहील. गाव पातळीवर कष्ट करणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या आहेत, आता चांगले आणि फ्रेश मनाने काम करा, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी नुकताच घेतला होता. या बदल्यांची प्रक्रिया आजपासून आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयात श्रीमती. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सुरू झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी, आयुक्त प्रवीण कुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल मुकणे यावेळी उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, ग्रामविकास मंत्री असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय मी घेतला होता, त्यावेळी त्याचा फायदा अनेक शिक्षकांना जे तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांना झाला. आऊट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेण्याची आवड असल्याने आताही पशुसंवर्धन विभागासाठी मी हा निर्णय घेतला. एकदा घेतलेला निर्णय बदलत नाही, त्यामुळे भविष्यातही हा निर्णय कायम राहणार आहे. माझे वडील लोकनेते मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, ज्याची पत नाही, ऐपत नाही त्यांचा आवाज बनण्यासाठी मी राजकारणात आहे, अगदी तोच वारसा घेऊन मी काम करत आहे. माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोकं आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काम करता, त्यामुळे हा निर्णय घेतला. सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला महत्वाचा वाटतो. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आपल्या परिवारापासून दूर असणारे, आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना यामुळे हवी ती पोस्टींग मिळणार आहे. हव्या त्या ठिकाणी बदल्या झाल्याने तुमच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद समाधान देणारा आहे, असं मंत्री मुंडे यावेळी म्हणाल्या.
लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी- सचिव डॉ. रामास्वामी एन.
पशुवैद्यकीय शिक्षणानंतर शासन सेवेत पदार्पण करणाऱ्या पशुवैद्यकांना लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी प्राप्त होत असते. पशुसंवर्धन विभागाचा आजवरचा गौरव टिकवून ठेवत या विभागाची प्रतिष्ठा आणखी उंचावण्याची सामुहिक जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय सेवांची उपलब्धता क्षेत्रीय स्तरावर सहजतेने करुन देणे आवश्यक आहे. या कामात समर्पित वृत्तीने सर्वांनी योगदान देत विभागाचा नावलौकीक वाढवावा, असे आवाहन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.
महापशुधन वार्ता’चे प्रकाशन
पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय सेवा, धोरणात्मक निर्णय व योजनांच्या अंमलबजावणीबाबत जनजागृती करण्यासाठी महापशुधन वार्ता या शिर्षकांतर्गत डिजीटल ई-मासिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘महापशुधन वार्ता’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
पशुपालकांना पशुसंवर्धनाच्या व्यवसायाची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी व आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन पद्धतीनुसार पशुपालकाच्या उत्पन्नात भर पडावी, या उद्देशाने विभागाने हे ई-मासिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पशुपालकाला हे मासिक एका क्लिकवर उपलब्ध व्हावे, यासाठी विभागामार्फत मासिकाच्या अंकाचा ‘क्यूआर कोड’ तयार करण्यात आला आहे. या क्यूआर कोडचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हवी ती पोस्टींग मिळाली, अधिकारी खूश!
समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही आजपासून सुरू झाली असून उद्याही म्हणजे १६ मे रोजी ही कार्यवाही सुरू असणार आहे. आज आदिवासी व नक्षलग्रस्त अवघड क्षेत्रात असलेल्या ११८ आणि बिगर अवघड क्षेत्रात असलेल्या ४४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या मनाप्रमाणे करण्यात आल्या. मंत्री मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मनाप्रमाणे आणि सहजतेने हवी ती पोस्टींग मिळाल्याने अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खूप चांगला निर्णय – डॉ. आकाश ठाकरे
मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे, माझी पहिली पोस्टींग २०२२ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे झाली. आदिवासी क्षेत्रात तीन वर्ष सेवा दिली. आता समुपदेशनाने मला माझा जिल्हा मिळाला. मला खूप आनंद झाला. मंत्री मुंडे यांनी घेतलेला निर्णय आमच्या सारख्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविणारा आहे.
डॉ. प्रियंका स्वामीदास
मी सिरोंचा तालुक्यात कार्यरत होते. हा भाग तेलंगणा सीमेवर असल्याने इथे मराठीपेक्षा तेलगू बोलली जाते. मला तेलगू भाषा येते.खेड्यातील लोकांशी चांगला संवाद साधता येतो. लोकं म्हणाले तुमची बदली झाल्यावर आमचे कसे होईल? आता समुपदेशनाने मी इथेच राहिले. हवे असलेले ठिकाणी मिळाल्याने मी खूश आहे. खरचं हा निर्णय ऐतिहासिक आहे. मंत्री मुंडे यांचे खूप खूप आभार!
०००