डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता प्रकल्प शेतकऱ्यांसाठी पथदर्शी ठरेल – वन मंत्री गणेश नाईक

प्रकल्पासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा पाठपुरावा

मुंबई, दि. १४: निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत रायगड येथे उभारण्यात येणारा डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता प्रकल्प नाविन्यपूर्ण असून तो शेतकऱ्यांसाठी पथदर्शी ठरणार आहे. यासाठी उर्वरित निधी वितरीत करण्याच्या प्रक्रीयेस गती देण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. रोहा येथील जैवविविधता प्रकल्पासाठी जुलैपूर्वी लागवड व्हावी व याचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती.

सह्याद्री अतिथीगृह येथे निसर्ग पर्यटनस्थळांचा विकास योजनेअंतर्गत रोहा, जामगाव येथे ४४ हेक्टर क्षेत्रात डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यान उभारण्याच्या कामाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिस्वास, वित्त विभागाचे अधिकारी कल्याणकुमार आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या प्रकल्पांतर्गत वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येईल. या उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट विविध जीवसृष्टीचा समतोल राखणे आणि नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करणे हा आहे. जैवविविधता २०२४-२५ करिता राज्य योजनेअंतर्गत ६६८.४२ लक्षचा प्रस्ताव आहे. यापैकी १०.५४ कोटीचा निधी प्राप्त असून, उर्वरित १५६२ लक्ष निधी मंजूर केल्यास तातडीने जैवविविधता प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे. पूर्व पावसाळी रोपवन कामे प्रगतीपथावर आहेत. जामगाव येथे ३७९ पार्ट येथे मुरूम रोड तयार करणे, तसेच अंतर्गत पाणी पुरवठा करण्याकरिता पाईप लाईन, टाकी, पंप हाऊस संदर्भातील कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जैवविविधता प्रकल्प पथदर्शी ठरणार असून, यासाठी उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून देण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी. देशात ज्या फुलांचे वृक्ष लावण्यात येतात, असे जास्तीत जास्त वृक्षे या जैवविविधता प्रकल्पात लावण्यात यावेत. याचबरोबर माणगाव नगरपंचायतीत येणाऱ्या आदिवासी नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठी पाणी पुरवठा, पथदिवे, स्वच्छतागृहे, विद्युतवाहिनी, रस्ते, शाळा या कामांसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/