मुंबई, दि.१४ : नागपूर शहर विस्तारत असून त्याठिकाणी आरोग्याच्या सेवा योग्य पद्धतीने होणे अपेक्षित आहे. कामठी येथे ५० खाटांचे रुग्णालय आहे ते १०० खाटांचे करण्यात यावे. त्याच्या बांधकामासाठी ५ एकर जागेची आवश्यकता आहे, पंरतू ६ एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालयात महसूलमंत्र्यांच्या दालनात नागपूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे विविध विषय, राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मंत्री श्री.बावनकुळे बोलत होते. यावेळी बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी पदांची आवश्यकता होती. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर आहार, सुरक्षा, वस्त्रधुलाई आणि स्वच्छता सेवा कंत्राटी पद्धतीने राबविण्याबाबतच्या प्रस्तावासही मंजूरी देण्यात आली आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पदमान्यता, नवीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जुन्या दवाखान्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतचाही आढावा घेण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान, मोहपा, मोवाड या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करुन ग्रामीण रुग्णालयामध्ये रुपांतर करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. उमरेड येथील ट्रामा केअर युनिटचा पदनिर्मिती प्रस्ताव, जिल्हा रुग्णालयास मंजूर ३५ कोटीचा निधी वितरीत करणे आणि डागा रुग्णालयास २० कोटीची आवश्यकता होती. त्यापैकी १३ कोटी रुपये मिळाले असून उर्वरित ७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधीही वितरीत करण्यात यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
कुही येथे ५० खाटांचे रुग्णालय
ग्रामीण रुग्णालय कुही येथे सध्या ३० खाटांचे रुग्णालय असून त्याचे श्रेणीवर्धन करुन ते ५० खाटांचे करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
0000
श्रीमती मोहिनी राणे/स.सं