मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता करून देणे आहे. त्यामुळे या योजनेतील तंत्रिक बाबी पूर्ण करून प्रकल्पाला गती द्यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालय येथे चिंचघाट उपसा सिंचन योजनेसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे, मुख्य अभियंता श्री. पराते व नागपूरचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, चिंचघाट उपसा सिंचन प्रकल्पामुळे अवर्षणग्रस्त भागास पाण्याची उपलब्धता होणार आहे. या योजनेतून कुही तालुक्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील 18 गावातील एकूण 3715 हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे.
या प्रकल्पास आवश्यक असणाऱ्या मंजुरी, तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
चिंचघाट उपसा सिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी जलसंपदा विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील , असे जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
०००
मोहिनी राणे/ससं/