नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य असलेले वेल्डिंग क्षेत्रातील मनुष्यबळ याला अत्यंत आवश्यक आहे. आशिया खंडात महाराष्ट्राने बॉयलर निर्मितीत आपला लौकिक निर्माण जरी केला असला तरी या क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आपल्याला घडवावे लागणार आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने या क्षेत्रातील जागतिक नावलौकिक साध्य करण्यासाठी तेवढ्याच गुणवत्तेची वेल्डिंग इन्स्टीट्यूट नागपूर येथे लवकरच साकारु, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.
हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित ‘वेल्ड कनेक्ट परिषदे’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अर्थ, नियोजन व कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, बाष्पके विभागाचे संचालक धवल अंतापूरकर, सहसंचालक स. ग. चौधरी, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीचे संचालक संजय मारुडकर, ऑरेंजबीक टेक्नॉलाजीचे व्यवस्थापकीय संचालक भानू राजगोपालन व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रत्येक क्षेत्रात नवतंत्रज्ञान व एआयच्या माध्यमातून सक्षम पर्याय निर्माण झाले आहेत. बॉयलर निर्मिती, व्यवस्थापनाच्या आणि याच्या देखभाल व दुरुस्तीसंदर्भात काही तांत्रिक अविष्कार साध्य करता येतील का हा कळीचा मुद्दा आहे. यासाठी बॉयलर इंडस्ट्रीमधील सर्व तज्ज्ञ, अभियंत्यांनी आपल्या कल्पनांचे आदान प्रदान केले पाहिजे. त्यावर विचार मंथनही झाले पाहिजे. यादृष्टीने आजची ही परिषद महत्त्वाची आहे, असे मंत्री फुंडकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर दिवस व आता याला जोडून दिडशे दिवसाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. अनेक सकारात्मक बदल पहिल्या शंभर दिवसाच्या उपक्रमातून साध्य झाल्याची अनुभूती सर्वांनी घेतली आहे. येत्या दिडशे दिवसाच्या उपक्रमात बॉयलरशी संबंधित असलेल्या सर्व उद्योजक आणि शासन यांच्यात अधिक तत्पर समन्वय साधला जावा यावर आम्ही भर देत आहोत. शासनपातळीवर लागणाऱ्या सर्व परवानग्या, प्रमाणपत्र यात पारदर्शकता वाढण्याच्या दृष्टीने बाष्पके विभागाने बीएमएमएस पोर्टल सुरु केल्याचे ते म्हणाले.
वेल्डिंग इन्स्टीट्युटसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – कामगार व वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
गत पंधरा वर्षात सबंध भारतात आपण कौशल्य विकासावर अधिक भर दिल्याचे पाहिले आहे. प्रत्येक क्षेत्राला लागणारे मनुष्यबळ त्या-त्या भागात निर्माण व्हावे हा यामागचा उद्देश होता. यात सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. तथापी काही क्षेत्रात अजूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी दडलेली आहे. वेल्डिंगचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारे असतानाही विदर्भातून या क्षेत्राकडे कमी प्रमाणात युवक वळले. या क्षेत्रात विदर्भातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवता येईल. यादृष्टीने नागपूर येथे होऊ घातलेल्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.
बॉयलर क्षेत्रात महाराष्ट्राला जागतिक संधी – संचालक धवल अंतापूरकर
राज्यात दरवर्षी सुमारे 1 हजार 200 बॉयलरची निर्मिती महाराष्ट्रात होते. आशिया खंडात महाराष्ट्र अव्वल असून या उत्पादनापैकी 300 बॉयलर्स हे विदेशात निर्यात होतात. 800 बॉयलर्स इतर राज्यात जातात. महाराष्ट्रात सूमारे 27 बॉयलर निर्माते असून या इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात तंत्रकुशल वेल्डरची गरज आहे, असे प्रतिपादन संचालक अंतापूरकर यांनी केले. विदर्भामध्ये वेल्डरसाठी मुले मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आयटीआय मध्ये दोन वर्षाचा कोर्स आणि दोन वर्षाच्या अनुभवानंतर प्रत्येक हाताला काम मिळेल एवढी रोजगाराची संधी उपलब्ध आहे. या पिढीला हे कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी जागतिक गुणवत्तेवर आधारित असलेल्या वेल्डिंग इन्स्टीट्युटची नागपूरला नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बॉयलर व्यवस्थापन आव्हानात्मक – संचालक संजय मारुडकर
औद्योगिक औष्णिक विद्युत निर्मितीत महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. यात विदर्भातील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. औष्णिक ऊर्जेसमवेत सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात आता उपलब्ध होत आहे. दिवसा सूमारे 6 हजार मेगावॅट वीजनिर्मिती सौर ऊर्जेतून होत असल्यामुळे औष्णिक विद्युत केंद्रांना दिवसा तेवढे प्रमाण कमी करावे लागते. रात्री ऊर्जेची ही गरज दररोज 6 हजार मेगावॅटने वाढत असल्याने याचा प्रत्यक्ष ताण हा बॉयलर यंत्रणेवर पडतो. यातूनच वारंवार बॉयलर दुरुस्तीचे काम वाढीला लागते. त्यावर तत्काळ यशस्वी मात करण्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे महाजेनकोचे संचालक यांनी सांगितले.
मान्यवरांचे स्वागत व आभार बाष्पके विभागाचे सहसंचालक स.ग. चौधरी यांनी केले. दिवसभर चाललेल्या या परिषदेत अनेक मान्यवरांनी विविध सत्राच्या माध्यमातून तज्ज्ञांशी संवाद साधला.
०००