चंद्रपूर, दि. ११ : चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सर्वांच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी करण्याकरिता आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी प्रत्यक्ष खोलीकरण होत असलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ 25 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने इरई नदीच्या खोलीकरण कामाचे योग्य नियोजन केले असले तरी कामाची गती वाढविणे आवश्यक आहे. चालू महिन्याअखेर पर्यंत सर्व नियोजित काम पूर्ण करावे. तसेच नदीतील गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येत आहे. आतापर्यंत 400 ब्रास गाळ मोफत वाटप करण्यात आला असून अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना गाळ प्राधान्याने द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
पहिल्या टप्प्यात राम सेतु ते चौरळा पूल दरम्यान अमुजमेंट पार्क जवळ व महर्षी शाळेमागे सध्या काम सुरू आहे. आतापर्यंत अमुजमेंट पार्क जवळ 350 मीटर व महर्षी शाळेमागे 120 मीटर एकूण असे एकूण 470 मीटर अंतरावरचे खोलीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कामावर 8 पोकलेन मशीन, 13 हायवा/ टिप्पर, 20 ट्रॅक्टर, 1 जे.सी.बी कार्यरत असून नदी पात्रातून आतापर्यंत 7500 ब्रास गाळ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 400 ब्रास गाळ वाटप करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.
०००