छत्रपती संभाजीनगर, दि.७, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी, दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य देत अडचणी तत्परतेने सोडवा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त श्री. दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून “संवाद मराठवाड्याशी” वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये विभागीय आयुक्त श्री.दिलीप गावडे, यांनी विभागातील दिव्यांगांच्या अडचणी, मागण्या या विषयावर विभागातील दिव्यांगांशी थेट संवाद साधला. यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा,सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त राजेंद्र अहिरे, राम लाहोटी आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यातील दिव्यांग यांनी त्यांच्या आजपर्यंत प्रलबिंत असलेल्या मागण्यांबाबत माहिती दिली.
अर्थसंकल्पित निधी निश्चित केलेल्या विविध विभागातून आर्थिक वर्षात खर्च करावा. दिव्यांगांच्या असलेल्या विविध समस्या व त्या अनुषंगाने उपाययोजना, राज्य शासनाचे शासन निर्णय, कायदा व विभागीय तरतूदी, दिव्यांग यांच्या नोकरीतील विविध अडचणी सुटण्यास गती द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी उपस्थित दिव्यांगाच्या जिल्हानिहाय समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.
छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्य़ातील निवासी उपजिल्हाधिकारी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, नगर पालिका मुख्याधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांनी दिव्यांगासाठी करावयाच्या पाच टक्के निधीतून शासन निर्णयानुसार सामुहिक व वैयक्तिक स्वरूपाच्या योजना वर खर्च करावा. दिव्यांग कर्मचारी यांच्या चार टक्के आरक्षण, पदभरती व पदोन्नती बाबतीत योग्य ती कारवाई करावी, अशा सुचना विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिल्या.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.