विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रशासनात  लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस उपक्रमाचा टप्पा यशस्वी पूर्ण

१५० दिवसांचा आगामी कार्यालयीन सुधारणा कामकाजांचा 

निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित करणार

मुंबई,दि.७ :  प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. शंभर दिवसात सर्व विभागांनी चांगले काम केले आहे. आगामी १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे या उपक्रमांतर्गतच ‘विकसित भारत २०४७’ च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले.

मंत्रालयात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांबाबत प्रथम क्रमांक प्राप्त कार्यालयांचे सादरीकरण, राज्यस्तरांवरील सर्वोत्कृष्ट कार्यालयांना प्रशस्तिपत्र वितरण, धोरणात्मक बाबी कार्यक्रमासंदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मंत्रालयीन विभागांचा व अधिका-यांचा गुणगौरव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार यासह मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शंभर दिवसांचा हा कार्यक्रम केवळ एक उपक्रम नव्हता, तर आपल्या शासनाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा होता. लोकाभिमुखता, कामकाजात सुलभता आणि जबाबदारी (अकाउंटेबिलिटी) या तीन आधारांवर प्रशासनात पुढे जाणे अत्यावश्यक आहे. या कार्यक्रमांतर्गत 10 प्रमुख मुद्यांवर सादरीकरण करण्यात आले आणि त्या अनुषंगाने काम करण्यावर भर देण्यात आला. राज्यातील 12 हजार 500 कार्यालयांना सुधारणा करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये सर्व कार्यालयांनी सकारात्मक सहभाग दर्शवला आहे. याच उपक्रमांत राज्याच्या 48 विभागांनी एक स्पर्धात्मक सादरीकरण सादर केले. प्रत्येक विभागाने स्वतः प्रश्नपत्रिका तयार केली व स्वतःच उत्तरंही दिली. 100 दिवसांमध्ये काय साध्य करणार हे स्पष्ट करत प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दाखवून दिली.प्रशासनात संरचनात्मक सुधारणा करणे ही काळाची गरज आहे. नव्याने केलेल्या सुधारणा संस्थात्मक पातळीवर राबवल्या गेल्यास प्रशासन निरंतर सुधारत राहील असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, दि.६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ हा पुढील 150 दिवसांचा कार्यक्रम आखला आहे.  शासकीय सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून यामध्ये विविध उपक्रम राबविल्यास ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा तयार करणे सुलभ होईल. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ मध्ये 16 शासकीय विभागांचे एकत्रीकरण करून संबधित विभागांचे सचिव (उदा. कृषी,आरोग्य) यामध्ये अल्प  व दीर्घ कालावधीत उद्दीष्ट आणि त्याची पूर्तता विभागातील आव्हाने, बलस्थाने यावर काम  करतील. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी हे असून 16 क्षेत्र आहे. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, भूमी, पाणी, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, कल्याण, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान, मानव संसाधन या विभागांचा समावेश आहे.२०२९, २०३५ आणि २०४७  अशा तीन टप्प्यात हे व्हिजन तयार करावे. १५० दिवसाच्या सेवाविषयक प्रशासकीय सुधारणामध्ये  Ease of Living मध्ये कार्यालयीन सेवा अधिक सुलभ करणे, Ease of Doing Busines प्रत्येक व्यावसायिक सेवा अधिक सुलभ करणे, G2G – Ease of Working राज्याअंतर्गत आणि केंद्रांच्या विविध विभागांशी समन्वय साधणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी अधिक गतीने काम करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाक आहेत दोघांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.नागरिकांना मंत्रालयात यावे लागू नये यासाठी स्थानिक पातळीवरच आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, ही शासनाची भूमिका आहे,जनतेला शासनाच्या विविध सेवा व सुविधा प्रभावीपणे मिळाव्यात, प्रशासनाला गती मिळावी,यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात आला. या उद्दिष्टपूर्तीमध्ये  अनेक विभागीय धोरणे, लोकाभिमुख योजना आखण्यात आल्या आणि अनेक विभागांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या विभागाच्या कार्याचा गौरव करण्यात आला असू प्रेरणादायक हे कार्य आहे. याआधी ‘शासन आपल्या दारी’ यासारखे उपक्रम राबविले गेले. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने जनतेच्या हितासाठी कार्य करणे गरजेचे आहे. शंभर दिवसांचा आराखडा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता पुढील 150 दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाची प्रतिमा अधिक उंचावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”

शंभर दिवसात सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या विभाग आणि अधिका-यांचा गौरव

यावेळी राज्यातील सर्व विभागांचा शंभर दिवसांच्या कामांचा आढावा तसेच या कामाचा उत्कृष्ट रित्या पाठपुरावा करून सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रथम क्रमांक विजेते अधिकारी  यांनी त्यांनी केलेल्या कामांचे  सादरीकरण केले.

सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग म्हणून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,सचिव अनुप कुमार यादव, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर,कृषी विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभाग मंत्री जयकुमार गोरे,प्रधान सचिव एकनाथ डवले, परिवहन व बंदरे विभाग मंत्री नितेश राणे, अपर मुख्य सचिव बंदरे विभाग संजय सेठी यांचा सत्कार करण्यात आला.

सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे-रोहन घुगे, नागपूर विनायक महामुनी, नाशिक आशिमा मित्तल, पुणे-गजानन पाटील, वाशिम वैभव वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर – विनय गौडा जी. सी., कोल्हापूर- अमोल येडगे, जळगाव -आयुष प्रसाद, अकोला – अजित कुंभार, नांदेड राहुल कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस अधीक्षक, पालघर – बाळासाहेब पाटील, गडचिरोली -निलोत्पल, नागपूर (ग्रामीण) – हर्ष पोतदार, जळगाव – महेश्वर रेड्डी, सोलापूर (ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर- मनीषा आव्हाळे, पिंपरी-चिंचवड शेखर सिंह, पनवेल मंगेश चितळे (तिसरा क्रमांक विभागून नवी मुंबई आयुक्त डॉ कैलाश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम पोलीस आयुक्त म्हणून पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर मधुकर पाण्डेय, ठाणे श्री.आशुतोष डुंबरे, मुंबई रेल्वे डॉ. रवींद्र शिसवे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक/ उपमहानिरीक्षक म्हणून परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक, कोकण श्री संजय दराडे, नांदेड- श्री शहाजी उमाप यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम विभागीय आयुक्त म्हणून विभागीय आयुक्त, कोकण डॉ. विजय सूर्यवंशी, नाशिक डॉ. प्रवीण गेडाम, नागपूर- श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांचा सत्कार करण्यात आला.सर्वोत्तम आयुक्त, संचालक  म्हणून संचालक, तंत्र शिक्षण विनोद मोहितकर, आयुक्त, जमाबंदी डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, आदिवासी विकास श्रीमती- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण   जीवनोन्नती अभियान श्री निलेश सागर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण श्री राजीव निवतकर यांचा सत्कार करण्यात आला.

शंभर दिवसाच्या कार्यक्रमात  १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले मंत्रालयीन विभाग

अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग – दिपक कपूर, अपर मुख्य सचिव खनिकर्म विभाग व  गृह विभाग- इक्बालसिंह चहल,अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग – विकास खारगे,अपर मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, बंदरे विभाग  – संजय सेठी, प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग – एकनाथ डवले, अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग – वेणुगोपाल रेड्डी, प्रधान सचिव, कामगार विभाग -आय.ए. कुंदन, प्रधान सचिव, वस्त्रोद्योग विभाग  – श्रीमती अंशु सिन्हा,सचिव, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग – एन. रामास्वामी, सचिव, रोजगार हमी योजना विभाग – गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

९०% उद्दिष्ट पूर्ण केलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये

९०% उद्दिष्ट पूर्ण केलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये अपर मुख्य सचिव, ऊर्जा विभाग श्रीमती आभा शुक्ला,अपर मुख्य सचिव, महसूल विभाग राजेश कुमार मीना, अपर मुख्य सचिव, परिवहन विभाग संजय सेठी,अपर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभाग – श्रीमती सोनिया सेठी, प्रधान सचिव, शालेय शिक्षण श्री. रणजित सिंह देओल,सचिव, उद्योग विभाग  – डॉ. पी. अन्बळगन सचिव, अन्न, औषध प्रशासन विभाग – धीरज कुमार यांचा सत्कार करण्यात आला.

सामान्य प्रशासन विभागाचा सेवाकर्मी पुरस्कार

सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यालयीन कामकाजासाठी  दिला जाणा-या सेवाकर्मी पुरस्कार प्रथम तीन क्रमांकाचे पुरस्कार वितरण पार पडले. यामध्ये ज्या विभागाच्या मंजूर पदसंख्या १० हजार पेक्षा जास्त असलेल्या विभागामध्ये मनिषा पाटणकर-म्हैसकर, अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनिषा वर्मा अपर मुख्य सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,श्रीमती शैला ए. सचिव (वित्तीय सुधारणा) वित्त (राज्यकर) विभाग यांचा सत्कार करण्यात आला. मंजूर पदसंख्या ३००० ते १०००० पद असलेले विभाग डॉ. रिचा बागला प्रधान सचिव, वित्त विभाग (लेखा व कोषागारे),श्रीमती विनीता वैद सिंगल प्रधान सचिव,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, राजगोपाल देवरा अपर मुख्य सचिव, गृह विभाग (राज्य उत्पादन शुल्क)मंजूर पदसंख्या ३००० पेक्षा कमी असलेल्या विभागाचे असीमकुमार गुप्ता ,अपर मुख्य सचिव, नगरविकास विभाग (नवि-१), श्री. एकनाथ डवले, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांचा सत्कार करण्यात आला.

100 दिवस बक्षीस वितरण प्रारंभीच भारतीय सैन्य दलाचे आणि पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले

ऑपरेशन सिंदुर हे नावच पुरेसे बोलके आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

००००

 

संध्या गरवारे/विसंअ