मीरा-भाईंदर महापालिकेच्या विकासकामांचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. ०५: मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेऊन विकासकामे गतीने करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.

मंत्रालय येथे मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह पुरातत्व, परिवहन, महसूल, पर्यावरण आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, मीरा-भाईंदर महापालिकेकडील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच ती विहित कालमर्यादेत करावीत. महसूल विभागाने बी.एस.यू.पी. योजनेंतर्गत यापूर्वी हस्तांतर केलेल्या जागेपैकी सद्यस्थितीत झोपडपट्टी असलेल्या जागेत पीपीपी तत्त्वावर इमारती बांधकामांसाठी जागा मीरा भाईंदर महापालिकेला हस्तांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.

विकासकामांचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करावे, खाडी किनारा विकसित करणे व स्काय वॉकची जागा रिकामी करून काम सुरू करावे, चेना रिव्हर फ्रंट 18 मीटर जागेचे भूसंपादन करावे, महापालिका मुख्यालय भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी वर्ग करावा, पर्यटन स्थळ विकास, शिवसृष्टी प्रकल्प, कांदळवन उद्यान या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. घोडबंदर किल्ला व परिसरात कामे करण्याबाबत महापालिकेस परवानगी देण्याबाबतही मंत्री सरनाईक यांनी निर्देश दिले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/