बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवड आणि कल पाहून पुढील मार्ग निश्चित करण्याचे आवाहन

  • परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के
  • मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ ने जास्त

मुंबई, दि. ०५ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी निकाल जाहीर केला.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास आहे. तथापि, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,97,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 91.88 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका सर्वाधिक आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल

कोकण विभागातील 22,797 (96.74 टक्के), कोल्हापूर विभागातील 1,06,004 (93.64 टक्के), मुंबई विभागातील 2,91,955 (92.93 टक्के), छत्रपती संभाजीनगर 1,65,961 (92.24 टक्के), अमरावती 1,32,814 (91.43 टक्के), पुणे 2,21,631 (91.32 टक्के), नाशिक 1,44,136 (91.31 टक्के), नागपूर 1,36,805 (90.52 टक्के) आणि लातूर विभागातील 80,770 (89.46 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलींची टक्केवारी अधिक

सर्व विभागीय मंडळांतून 6,76,972 मुले तर 6,25,901 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी जास्त आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,49,932 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 4,07,438 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5,80,902 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1,64,601 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

विज्ञान शाखेतील 7,15,595 विद्यार्थी (97.35 टक्के), कला शाखेतील 2,81,606 (80.52 टक्के), वाणिज्य शाखेतील 2,77,629 (92.68 टक्के), व्यवसाय अभ्यासक्रम 24,450 (83.26 टक्के) तर आयटीआय मधील 3,593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (82.03 टक्के).

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.38

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,258 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी 92.38 इतकी आहे.

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधार साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/