मुंबई, दि. ०४ : प्राप्त संधी आणि प्रशिक्षण याच्या आधारे तळागाळातील सक्षमीत महिला स्वयं सहायता गटातील महिला देशातील अन्न सुरक्षा मानकांना परिभाषित करू शकतात, याचे माहिम सीफूड प्लाझा हे एक उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र ईट राईट स्ट्रीट फूड हब या परिवर्तनशील उपक्रमात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान आहे, अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
देशातील पहिले संपूर्णपणे महिलांकडून संचलित ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’ मुंबईत सुरू करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन, बृहन्मुंबई विभाग यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने, माहिम रेतीबंदर येथे स्वयं सहायता गटाच्या सदस्य असलेल्या महिलांकडून भारतातील पहिले संपूर्णपणे महिलाकडून संचालित ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ 2 मे रोजी माहिम येथे पार पडला. राज्यमंत्री कदम यांच्याहस्ते महिला स्वयं सहायता गटांच्या 153 महिलांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर, बृहन्मुंबई विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने उपस्थित होते.
येथील महिलांकडून तयार अन्नपदार्थ हे फक्त स्वच्छ व चविष्ट नसून त्यामध्ये कोकणची पारंपरिक खाद्य संस्कृती खोलवर रुजलेले असल्याचे सांगत राज्यमंत्री कदम यांनी स्वयं सहायता गटांच्या सर्व महिलांचे स्वच्छतेची उच्च मानके राखल्याबद्दल गौरवोद्गार काढले. माहिम सीफूड प्लाझामधील खाद्यपदार्थ स्टॉल्सना राज्यमंत्री कदम यांनी भेटी दिल्या. तसेच अस्सल कोळी पदार्थांचा आस्वाद घेत महिला उद्योजकांशी संवाद साधला.
माहिम सीफूड प्लाझा दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असतो. स्वयं सहायता महिला बचत गटाच्या 153 महिलांद्वारे पूर्णपणे व्यवस्थापित, प्रत्येक स्टॉलवर कठोर स्वच्छता नियमांचे पालन केले जाते. येथील महिलांनी ईट राईट इंडिया उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन (FoSTaC) कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे, ज्यामध्ये ऑडिट आणि तपासणीद्वारे अन्न सुरक्षा मानकांचे संपूर्ण पालन सुनिश्चित केले जातात.
राज्यमंत्री कदम यांनी यावेळी हबच्या यशस्वी प्रमाणीकरणासाठी योगदान दिलेल्या प्रमुख व्यक्तींना देखील सन्मानित केले. ज्यामध्ये बीएमसी जी-उत्तर वॉर्डचे समुदाय संघटक दक्षिता पवार आणि अनिकेत पाटेरे, समुदाय विकास अधिकारी अनिकेत पाच्छरकर आणि अजिंक्य पाच्छरकर, सहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे.
०००
नीलेश तायडे/विसंअ/