मुंबई, दि.२ : पारंपरिक प्रसारमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांच्या एकत्रीकरणामुळे माध्यम जगतात क्रांतिकारक बदल घडून येत असून यामुळे सशक्त ‘माध्यम इकोसिस्टम’ तयार होत आहे, असे प्रतिपादन गॅझप्रोम मीडिया होल्डिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर झारोव्ह यांनी केले.
वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये सुरू असलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (WEAVES) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘माध्यम सामग्रीच्या एकत्रित शक्ती’ या विषयावर आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते.
श्री. झारोव्ह म्हणाले, भारत-रशिया सहनिर्मितीचा ‘द लिट्ल किंग ऑफ माय हार्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्याचे चित्रीकरण मुंबई आणि जोधपूर येथील ऐतिहासिक स्थळांवर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात भारतीय कलाकारांनी रशियन कलाकारांसोबत एकत्रित काम केले आहे. यामध्ये भारतीय सिनेमातील भावनात्मक शैली आणि रशियन विनोद यांचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेले देश आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीत दोन्ही देशांमधील कलावंत एकमेकांच्या संस्कृती समजून घेऊन काम करत होते,असेही झारोव्ह यांनी यावेळी नमूद केले.
तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावरील ब्लॉगर आणि कंटेंट क्रिएटर्सनी मोलाची भूमिका बजावली आहे. या माध्यमातून दोन्ही देशांमधील मैत्री आणि सांस्कृतिक संबध अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास श्री.झारोव्ह यांनी यावेळी व्यक्त केला.
0000