वेव्हज् परिषद – २०२५
मुंबई, दि. ०१ : भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ (व्हेव्ज) चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी श्री. वैष्णव बोलत होते. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माहिती व प्रसारण मंत्री वैष्णव म्हणाले, ‘आयआयसीटी’च्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
सर्जनशीलतेच्या जगात सध्या मोठे परिवर्तन घडत आहे. तंत्रज्ञानामुळे सर्जनशील उद्योग आता सर्वांसाठी खुले झाले आहेत. कंटेंट तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे, तसेच कंटेंटचा उपभोग घेण्याचे माध्यमही बदलत आहे. या बदलत्या प्रक्रियेची समज आणि वाटचाल एकत्रितपणे करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण सर्जनशील जगाला वेव्हजच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हे व्यासपीठ जगभरातील निर्मात्यांसाठी खुले आहे. हे व्यासपीठ नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, गुंतवणूकदार, निर्माते आणि खरेदीदार यांच्याशी जोडणारी संधी देईल. यामुळे नव्या आर्थिक संधींचा उगम होईल.
या परिषदेस जगभरातून धोरणकर्ते, उद्योग नेते आणि ७५ देशांतील निर्माते सहभागी झाले असून पुढील चार दिवसांत १०० सत्रे विविध स्वरूपात पार पडणार आहेत. सर्जनशील समुदाय क्रिएट इन इंडिया स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले असून ३२ क्षेत्रांमध्ये ह्या स्पर्धा झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/