मुंबई, दि. ०१ : व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली सृजनशीलता प्रत्येकाने आपल्या परीने जोपासावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५ (जागतिक दृकश्राव्य मनोरंजन समिट) चा आरंभ झाला. यावेळी ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ मधील विजेत्यांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताला संगीत, नाटकासह विविध कला प्रकारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. तो अधिक वृद्धिंगत करण्यासाठी नव्या पिढीतील सृजनशीलतेला नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी विविध संधी उपलब्ध करून देत प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आपले शरीर कोणत्याही अपायकारक बाह्य गोष्टीला स्वीकारत नाही, त्याचप्रमाणे माणसाची सृजनशीलता वाईट गोष्टींना आपल्या मनामध्ये टिकू देत नाही. आपले मन उल्हसित ठेवण्याची महत्त्वाची भूमिका सृजनशीलता पार पडत असते. संगणकावर आपल्या बोटांचा वापर करणारा संगणक अभियंता थकतो तर त्याचवेळी एखादा वयोवृद्ध सतारवादक त्या संगणक अभियंत्याच्या तुलनेत जास्त प्रसन्न, उल्हासित राहतो. हा फरक सृजनशीलतेमुळे पहावयास मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील कला, सृजनशीलतेला प्रोत्साहन देत जोपासली पाहिजे. भारत सर्व क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. त्याच धर्तीवर सृजनशीलतेच्या क्षेत्रात ‘वेव्हज’च्या माध्यमातून पुढे आलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना यशाचा मोठा पल्ला गाठतील,असे सांगून प्रधानमंत्री मोदी यांनी या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’मधील विजेत्यांच्या दालनांना भेट देऊन त्यांच्या संकल्पनांची माहिती घेतली.
०००
वंदना थोरात/विसंअ/