बॉलिवूडचे महान अभिनेते मनोज कुमार यांना ‘वेव्हज्’ ची श्रद्धांजली

मुंबई, दि. ०१: वेव्हज् २०२५ मध्ये ‘मनोज कुमार यांच्या आठवणींना उजाळा : उत्कृष्ट चित्रपट निर्माते, अस्सल राष्ट्रवादी’ या ‘वेव्हज् ब्रेकआउट’ सत्रात श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि पॉडकास्टर मयंक शेखर यांनी  सूत्रसंचालन केलेल्या या सत्रात चित्रपट आणि साहित्य जगतातील प्रमुख व्यक्तींनी एकत्र येत दिग्गज अभिनेते, लेखक आणि चित्रपट निर्मात्याच्या वारशाबाबत आपले विचार मांडले.

हरिकिशन गिरी गोस्वामी हे मनोज कुमार यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म 1937 मध्ये झाला. मनोज कुमार यांचे आयुष्य त्यांच्या चित्रपटांइतकेच नाट्यमय आणि प्रेरणादायी होते. फाळणीमुळे कोलमडून गेलेले मनोजकुमार अनेक  स्वप्ने उराशी बाळगून  मुंबईत आले पण चित्रपट जगतामध्‍ये  त्यांचा कुणाशीही संबंध नव्हता. सुरुवातीला  उर्दूमध्ये पटकथा लिहिणारे एक स्वयंघोषित कथाकार असणाऱ्या मनोज  कुमार यांनी  चित्रपट अभिव्यक्तीत वेगळा बाज  तयार केला – मुख्य प्रवाहातील आकर्षणाला राष्ट्रवाद आणि सामाजिक विवेकाच्या भावनेची जोड दिली.

मनोज कुमार यांचे सुपुत्र आणि अभिनेता कुणाल गोस्वामी यांनी सत्राची सुरुवात जिव्हाळ्याच्या आठवणींनी केली: “माझ्या वडिलांनी फाळणीत सर्वस्व गमावले, पण त्यांनी कधीही आपले स्वप्न हरवू दिले नाही. निर्वासित छावण्यांमध्ये राहण्यापासून ते उर्दूमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास लवचिकतेचा दाखला  आहे. त्यांनी भगतसिंगांच्या आईला ‘शहीद’ च्या प्रीमियर प्रसंगी सोबत आणले होते  – वैयक्तिक स्तरावरही त्यांची देशभक्ती इतकी प्रखर होती की, त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली त्याच्या खोलवर मुळाशी राष्ट्रवादचं असे.’’

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी मनोज कुमार यांच्या सिनेमॅटिक तंत्रांची आठवण करून देताना सांगितले की गाणी चित्रित करण्याची त्यांची शैली आगळी-वेगळी होती. भांडारकर पुढे म्हणाले की मनोज कुमार यांचे चित्रपट राष्ट्रवाद आणि सामाजिक वास्तववादाने भरलेले होते, जे त्यांनी स्वतःच्या कामातही प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्येष्ठ लेखक आणि गीतकार डॉ. राजीव श्रीवास्तव म्हणाले की,  मनोज कुमार यांचे जीवन म्हणजे सामान्य माणसाच्या भाषेतील सिनेमॅटिक मिशन होते.

ज्येष्ठ स्तंभलेखिका आणि चरित्रकार भारती एस. प्रधान म्हणाल्या की, मनोज कुमार यांना  प्रचंड यश मिळाल्यानंतरही ते सर्वांना अगदी सहजतेने भेटत होते. इतकेच नाही तर, आजारी असतानाही ते त्यांच्या पुढच्या चित्रपटाचे स्वप्न पाहत असत. नेहमी पुढची, भविष्‍यात करावयाच्या  नवीन कामांविषयी त्यांना खूप उत्साह असे.’’

एक वारसा जो जिवंत राहिला…

प्रेमाने  भारत कुमार म्हणून ओळखले जाणारे मनोज कुमार यांना पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. त्यांचे चित्रपट – शहीद, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, उपकार, क्रांती – हे केवळ चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचे टप्पे नव्हते, तर सांस्कृतिक टप्पे होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात तसेच देशभक्ती आणि कथाकथनाला उदात्त बनवणाऱ्या माणसाबद्दल कृतज्ञतेची सामूहिक भावना व्यक्त करत सत्राचा शेवट झाला.

०००

सागरकुमार कांबळे/ससं/