सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर – केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

वेव्हज् परिषद – २०२५

मुंबई, दि. ०१: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य केले आहे. जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेच्या माध्यमातून भारतीय कला जगभर पोहोचवण्याची संधी प्राप्त झाली आहे. यातून सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत सांस्कृतिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शेखावत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, उद्योग मंत्री उदय सामंत, राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, यु-ट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी निल मोहन तसेच विविध देशातील मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक मंत्री शेखावत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा उद्घोष झाला आहे. भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर नेल्याने याचे फलित म्हणून कोडियाट्टम, वैदिक पठण, रामलीला, गरबा यांसह १५ सांस्कृतिक घटक युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. याशिवाय, भरतमुनींचे नाट्यशास्त्र आणि भगवद्गीताही युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’ रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आली.

मीडिया आणि विकास क्षेत्रात आघाडी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

भारत प्राचीन कला आणि आधुनिकतेला एकत्र आणत आहे, म्हणूनच जागतिक माध्यमे आणि विकास क्षेत्रात आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी भारत नैसर्गिक पर्याय ठरत आहे. वेव्हजच्या माध्यमातून आपण मनोरंजनासह देशाच्या संस्कृतीच्या संवर्धनाची प्रेरणा देत असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने झाली. त्यांच्या वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. नागालँड येथील कलाकारांनी नागालँडची लोककला सादर केली.

पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांच्या ‘अप्सरा आली’ या गाण्याला तर पॉप संगीत गायक अलन वाल्कर यांच्या पॉप संगीताला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे लोकार्पण

एम. एम. किरामणी यांनी संगीत दिलेल्या आणि ए. आर. रहमान, शंकर महादेवन, प्रसन्न जोशी, रॉकी केज, मित ब्रदर यांनी गायलेल्या वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/