सिंधुदुर्ग, दिनांक 1 मे 2025 (जिमाका वृत्त) : आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा बनविण्याचा निर्धार करुन हा प्रवास सुरू केला आणि आज आपला जिल्हा राज्यात ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा ठरला असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.
‘ए आय’ प्रणालीचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शरद कृषी भवनात पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले आदी उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी या संपूर्ण ए.आय प्रणालीविषयी सादरीकरण केले.
पालकमंत्री पुढे म्हणाले, आज आपल्या जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण आहे. एआय प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. साक्षरतेमध्ये आपला जिल्हा आघाडीवर आहे. दरडोई उत्पन्नामध्ये पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आलेला आहे. टँकरमुक्त जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. विशेष म्हणजे भविष्यात ‘एआय’ प्रणालीयुक्त जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, आपला जिल्हा यापुढे एआय प्रणालीचा उपयोग करणार आहे. आज आपण पहिल्या टप्प्यात असून नुकतीच सुरूवात झालेली आहे. या प्रणालीमध्ये टप्याटप्याने होणारे बदल आपण स्विकारणार आहोत. अनेक देश एआय प्रणालीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करुन देशाचा विकास करत आहेत. आपल्या जिल्ह्यानेही या प्रणालीच्या वापरात पहिले पाऊल ठेवले आहे. जिल्ह्याचा विकास करत असताना अनेक आव्हाने समोर आहेत पण त्यावर देखील मात करत आपण जिल्ह्याचा विकास करणार आहोत. शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी देखील या प्रणालीचा मोठा उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले की, प्रशासनामध्ये या प्रणालीचा उपयोग व्हावा यासाठी पालकमंत्री नितेश राणे पाठपुरावा करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासन या कामात पुर्णपणे गुंतलेले आहे. या प्रणालीमुळे प्रशासनाच्या कामकाज नक्कीच पारदर्शक, गतीमान आणि सुलभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन सुकर होणार असल्याचेही ते म्हणाले.
0000000