जळगाव ‘१०० टक्के निवारा’ असलेला राज्यातील पहिला जिल्हा करण्याचा संकल्प – पालकमंत्री गुलाबराव पाटील

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

  • जिल्ह्यात ११ ठिकाणी बहिणाबाई मार्ट सुरू होणार – नियोजन समितीची मंजुरी
  • राष्ट्रीय महामार्ग वळणरस्ता अंतिम टप्प्यात; पावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता

जळगाव, १ मे (जिमाका): जिल्ह्यात अवास योजनेअंतर्गत १ लाख ९ हजार ९७७ घरकुले पूर्ण झाली असून १ लाख २२ हजार ९७१ घरकुले प्रगतीपथावर आहेत. २५,१३२ लाभार्थ्यांना शासकीय जागा वितरित करण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यात एकही परिवार पक्या घरापासून वंचित राहणार नाही असा राज्यातला पहिला जिल्हा करण्याचा संकल्प आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जिल्ह्यातील जनतेला उद्देशून त्यांनी संदेश दिला.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह विविध प्रशासनिक अधिकारी, जनप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीलाच पालकमंत्र्यांनी पहलगाम अतिरेकी हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या.

जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा घेताना सलग तीन वर्षे जिल्हा वार्षिक योजनेतील शंभर टक्के निधी खर्च करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश असून, यंदा ७० कोटींचा वाढीव निधी मंजूर झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले

‘सर्वांना निवारा’ संकल्प

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १.०९ लाख घरकुले पूर्ण झाली असून, १.२२ लाख घरकुले प्रगतीपथावर आहेत. २५,१३२ लाभार्थ्यांना शासकीय जागा वितरित करण्यात आली आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व घरकुले पूर्ण करून जळगाव जिल्हा १०० टक्के निवारा असलेला राज्यातील पहिला जिल्हा करण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

महिलांचा आर्थिक सशक्तीकरणासाठी टप्पा

जिल्ह्यात ३०,००० महिला बचतगटांमधून ३ लाख महिला कार्यरत असून त्यांना ४१० कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे. यातील १.०७ लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या असून, यावर्षी १ लाख महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच ११ ठिकाणी बहिणाबाई मार्ट उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पाणी पुरवठा व सिंचन प्रगतीपथावर

जलजीवन योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. गेल्या वर्षी १ मे पर्यंत उन्हाळ्यात ८३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा होत होता; आता १ मे रोजी ही संख्या केवळ ८ गावांवर आली आहे. संपूर्ण जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेळगाव बॅरेजचे काम मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाले असून, १११५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यंदा ३७ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून त्यामुळे २५ गावांना थेट फायदा झाला आहे आणि १२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली  येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रात झपाट्याने वाटचाल

दीपनगर येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, मुख्यमंत्री सौर वाहिनीअंतर्गत ३२८ मेगावॅट अतिरिक्त वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंड वीजपुरवठा शक्य होईल,अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

जळगाव शहरालगतचा राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापूर्वी वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

समग्र विकासाकडे वाटचाल

हवाई सेवा, क्रीडा, वैद्यकीय सुविधा, जलजीवन, सिंचन प्रकल्प, वळण रस्ता आदी क्षेत्रांचा आढावा घेत, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. “जिल्ह्याचा प्रवास सतत उत्कर्षाकडे राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

०००