- उत्पादन वाढीसाठी कृषी क्षेत्रात एआयचा वापर करावा
- शेतकऱ्यांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करावे
नांदेड, दि. 1 मे :- नांदेड जिल्ह्याला खरीप हंगाम 2025 साठी एकुण 7 लाख 76 हजार 762 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी बि-बियाणे, खते, किटकनाशके यांचा पुरवठा करण्यास कमतरता भासू देऊ नका, अशी सूचना राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. ख्ररीप हंगाम 2025 पुर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार भिमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार आनंदराव तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत तसेच विविध संबंधित विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे पुरवठा व्यवस्था योग्यरितीने करावा, त्यांना बियाणे व किटकनाशकांची उपलब्धता वेळेत होईल याचे नियोजन कृषी विभागाने करावे. जिल्ह्यातील बोगस बि-बियाणे पुरवठा करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांची जास्तीत जास्त माहिती होण्यासाठी कृषी विभागाने व्हॉटसअप ग्रुप तयार करुन त्याद्वारे त्यांनी आवश्यक माहिती पोहोचवावी. कृषी क्षेत्रात एआयचा वापर करुन शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे असेही निर्देश त्यांनी दिले. ज्या बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात त्यांना शासनाकडून देण्यात येणारी सवलत कमी करण्याबाबतही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पिकविमा अनेक तालुक्यामध्ये खूप कमी अधिक प्रमाणात वितरीत होत आहे. याबाबत तालुका स्तरावर नियोजन असावे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तालुका पातळीवर व्यवस्था करावी, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली. तसेच विमा कंपनीने आतापर्यत किती रक्कम वितरीत केली, अजून किती रक्कम येणे शिल्लक आहे याची वर्षनिहाय माहिती द्यावी. उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर, जिल्ह्यात जलसंधारण व जलसंपदाच्या मंजूर प्रकल्पांना निधी उपलब्ध व्हावा, जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र वाढावे यासाठी उपाययोजना आखाव्यात अशा सूचना खासदार अशोक चव्हाण यांनी केल्या. यासोबत त्यांनी अर्धापूर व मुदखेडला केळी निर्यात सुविधा केंद्र व धर्माबादला मिर्ची संशोधन केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला.
नांदेडला सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरु करावे तसेच शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी नांदेड जिल्ह्यात आयसीएआरचे केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केली.
प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी पीपीटीद्वारे जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी केलेल्या पुर्वतयारीच्या नियोजनाची माहिती दिली. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कृषि मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यस्तर प्रथम क्रमांक विजेते माधव शंकरराव पाटील रा. चैनपूर ता. देगलूर व सुनिल नामदेव चिमनपाडे रा. कुडली ता. देगलूर यांना द्वीतीय क्रमांक मिळाल्याबाबत त्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील आतापर्यत अवयवदान केलेल्या दात्यांच्या कुटूंबियांचा सन्मान पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये चंद्रकला रावळकर, भाग्यश्री संतोष मोरे, सोनाली भुजंग मस्के, नामदेव दादाराव पवळे, लक्ष्मीबाई पवळे, शोभा सुर्यकांत साधु व डॉ. दिपक साधु, प्रिया अभिजीत ढोके यांचा सन्मान करण्यात आला. अवयवदानाची शपथ पालकमंत्र्याच्या हस्ते उपस्थितांना देण्यात आली.
जिल्ह्यातील 7 विद्यार्थी युपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये कृष्णा जाधव पाटील, सुनिल रामलिंग स्वामी, आयुष कोकाटे, वेदांत माधव पाटील उंचेकर, अतुल अनिल राजूकर, शिवराज गंगावळ, आनंद सदावर्ते यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
00000