बीड जिल्ह्याच्या विकासाला शासनाचे प्रधान्य – इंद्रनील नाईक

दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र दिन साजरा

बीड, दि. 1 (जि.मा.का.) :  बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला शासनाने प्राधान्य दिले आहे. येथील साधन सुविधांचा विकास करून विकसित जिल्हा अशी बीड जिल्ह्याची नवी ओळख घडवून यात नागरिकांनाही योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाराष्ट्र दिनी केले.

बीड येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज श्री नाईक यांच्या हस्ते येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची प्रमुख उपस्थिती होती.

संयुक्त महाराष्ट्र लढयात प्राणांचे बलिदान देणा-या 105 हुताम्यांसोबतच पहेलगाम येथे अतिरेकी हल्यात प्राण गेलेल्या नागरिकांना आपल्या भाषणात त्यांनी आरंभी श्रध्दांजली अर्पण केली.

राज्यात गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण करून उद्योग व्यवसायांची वाढ करण्याचे धोरण स्वीकारल्याने कला, क्रीडा, संस्कृती, साहित्य यासोबतच राज्य उद्योगातही अग्रणी ठरले आहे. याबद्दल श्री नाईक यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार आरंभी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर येथे विकासाला चालना मिळेल या पद्धतीने काम सुरू केले आहे. जिल्हा मुख्यालयात मूलभूत सुविधांचा विकास करण्यासोबतच विमानतळ उभारण्याची घोषणा केली आणि या कामाला गती दिली यामुळे आता बीड जिल्हा विकासासाठी सज्ज झाला असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.

या ठिकाणी रोजगार आणि स्वयंरोजगार यासाठी टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने एक अद्यावत असे इन्सुवेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. यात 191 कोटींचा खर्च आहे त्यातील 163 कोटी सदर कंपनी गुंतवणार असून उर्वरित वाटा उद्योग विभागाचा असेल असे सांगून श्री नाईक म्हणाले की, जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गुंतवणूक परिषदेत 930 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत याचा या खात्याचा राज्यमंत्री या नात्याने मला आनंद आहे.

आद्यकवी मुकुंदराज यांचा हा जिल्हा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच प्राप्त झाला आहे यासाठी पुढचं पाऊल म्हणून अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव, म्हणून शासनाने घोषित केले आहे. यामुळे साहित्य, नाट्य तसेच चित्रपट क्षेत्रात असणारी बीड जिल्ह्याची ओळख उजळून निघणार आहे असे ते म्हणाले.

लाडकी बहीण योजना राबवताना महिलांना बस प्रवास सवलत, ज्येष्ठांना बस प्रवास सवलत तसेच महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात कोणतीही उत्पन्नाची अट न घालता 12 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार आदी माध्यमातून शासन विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना पिक विमा, विज बिल माफी यासह सौर शेतीपंप आदी माध्यमातून सहाय्य करणे सुरू आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचे शानदार संचालन झाले. पोलीस, होमगार्ड, अग्निशामक दल यांच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली त्यानंतर विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेते आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते यांचा मंत्रिमहोदयाच्या हस्ते गौरव करण्यात आला.

०००