सामान्य माणसाचे विकासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र दिनी ग्वाही

गडचिरोली, (जिमाका) दि.01:  “सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,” अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्र दिनी दिली.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ॲड. आशिष जयस्वाल बोलत होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना ॲड. जयस्वाल यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत घरकुल योजनांत भरीव प्रगती झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पी.एम. जनमन, मोदी आवास, रमाई, शबरी व आदिम आवास योजनांमधून शासन सामान्य माणसाच्या घरकुलांचे स्वप्न शासन पूर्ण करत आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, प्रशासन अधिक गतिमान व नागरिकाभिमुख होण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री विशेष लक्ष देत आहेत आणि भविष्यात गडचिरोली जिल्हा इतर आघाडीच्या जिल्ह्यांच्या बरोबरीने सरासरी गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सोहळ्यास स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सर्व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव सहपालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दुर्गम भागासाठी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

0000