बुलढाणा, दि.1 (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करू या आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ या, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी महाराष्ट्र दिनी केले.
पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 66 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अजिक्य गोडगे, माजी आमदार विजयराज शिंदे, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय वाढीस लागण्यासाठी यावर्षी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत 4 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागेची लागवड केली असून शेतीपूरक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतिसाद देत आहेत.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना व अटल भूजल योजनेंतर्गत सुमारे 33 हजार लाभार्थ्यांना सुमारे 79 कोटी रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 1 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 144 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. अवेळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीमुळे सुमारे 4 लाख शेतकऱ्यांचे 3 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले होते. त्याकरीता शासनाने सुमारे 490 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 19 व्या हप्त्याचा सुमारे 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक, म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 47 हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपला फार्मर आयडी तयार केला नाही, असे शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित आपले शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील पाणीसाठ्याची सध्याची स्थिती विचारात घेता, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने योग्य आणि प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ आणि ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे आणि नद्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या तब्बल 109 प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे आपल्या जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन हजार एकरात 91 उपकेंद्रांद्वारे 401 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पातून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल. तसेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत 5 हजार लाभार्थ्यांनी आपल्या घरांवर रुफटॉप सोलर पॅनल्स बसवले असून त्यांचे वीजबिल कमी होण्यास मदत होत आहे. तसेच प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत 7 हजार शेतकऱ्यांनी सोलर पॅनल्स बसवून शेतीसाठी वीजेचा वापर सुरु केला आहे. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण-2 अंतर्गत 58 हजार घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहेत. तसेच रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात 19 हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले असून 8 हजार घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती पालकमंत्री यांनी यावेळी दिली.
100 दिवसाच्या सात कलमी कृती कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे जुने महसुली अभिलेख व प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘सहज’ प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे दस्तऐवज आता केवळ एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होत आहेत. यासोबतच, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत ऑनलाईन सेवा सुरु असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील ना. पाटील यांनी केले. तसेच जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविली जात असून ती आता राज्यभर वापरली जात आहे, ही बुलढाणासाठी गौरवाची बाब आहे. यासोबतच, विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील 458 शेतरस्ते, पाणंद रस्ते खुले केले असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या जिल्हा गुंतवणूक परिषदेत 86 सामंजस्य करार झाले असून, त्यातून सुमारे 631 कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक आणि 3 हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. या माध्यमातून बुलढाणा जिल्हा औद्योगिक विकासामध्ये अग्रेसर राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नवउद्योगांना मंजुरी देण्यात आपला बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे. तर राज्यात चौथा आला आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातून अनेक नवीन उद्योग सुरू झाल्यामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत व होत असल्याचे पालकमंत्री ना. पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू प्रथमेश समाधान जवकार याच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असल्याची भावना पालकमंत्री ना. पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात पोलीस विभागाने शानदार पथसंचलन केले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश मोरे यांनी केले.
यावेळी पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी जम्मू आणि काश्मिर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील मृतांना श्रद्धाजंली वाहिली. या कार्यक्रमात 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी राबविलेली जिवंत सातबारा मोहीम राज्यस्तरावर अंमलबजावणी होत असल्याच्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसिलदार विठ्ठल कुंभरे, नायब तहसिलदार निखिल पाटील, मंडळ अधिकारी जर्नादन बंगाळे, संजय चौधरी, शिवानंद वाकदकर, पोलिस विभागाचे पोलीस निरिक्षक संग्रामसिंह पाटील, पोलीस हवालदार सुनिल जाधव, राजू आडवे, जिल्हािपरिषद शाळेचे ओम भोंडे, अंजली डांगे, जिल्हा क्रिडा विभागांतर्गत जिल्हा युवा पुरस्कार विजेता प्रभाकर वाघमारे, साहसी पुरस्कारार्थी कु. सिद्धी सोनुणे, महावितरणचे गणेश राणे व इत्तर नाट्य संघातील कर्मचारी आणि अवयव दान केलेल्या पद्माताई सावळे व वामनराव पडघान यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
0000000