पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न

क्रीडा संकुलातील नवीन सोयी सुविधांसाठी १६ कोटीच्या कामांस मंजूरी

धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील खेडाळूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी धुळे जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा निर्माण करण्याच्या 16 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्याबरोबरच तालुका क्रीडा संकुलाच्या धर्तीवर अपर तहसिल कार्यालयाच्या ठिकाणीही क्रीडा संकुल उभारण्यास शासनाची मंजूरी मिळावी याकरीता क्रीडा विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.

येथील जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयात पालकमंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, शिक्षणाधिकारी मनिष पवार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषदेचे समजाकल्याण अधिकारी नितीन खंडेराय, उप कार्यकारी अभियंता श्री. झाल्टे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्यासह समितीचे सदस्य,  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, जिल्ह्यातील अपर तहसिलदार कार्यक्षेत्रात नविन क्रीडा संकुल उभारण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी राज्याच्या क्रीडा विभागाकडे  प्रस्ताव सादर करावा. तसेच क्रीडा संकुल उभारण्यासाठी महसूल विभागाने जागा उपलब्ध करुन द्यावी. धुळे जिल्ह्यातून आंतरराष्ट्र्रीय खेळांडू निर्माण करण्यासाठी क्रीडा संकुलात खेळांडूसाठी नियमित 7 दिवसांचे विविध खेळांचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. यासाठी क्रीडा प्रशिक्षक, संघटनाची एक समिती बनवावी. क्रीडा संकुलातील जलतरण तलावात लाईफ गार्डसह तज्ञ प्रशिक्षिक नियुक्त असणे आवश्यक आहे. क्रीडा संकुलात नवीन कामे घेतांना दर्जेदार कामे करावेत. खेळांडूना निवास व्यवस्थेसह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. क्रीडा संकुलात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणेसाठी महापालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी. संकुलात सोलर युनिट, सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावीत. क्रीडा संकुलातील गाळे धारकांच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढण्याबरोबरच गरुड मैदान क्रीडा संकुलात लिफ्टची सोय करावी अशा सूचना पालकमंत्री श्री.रावल यांनी बैठकीत दिल्यात.

या बैठकीत क्रीडा संकुलाच्या प्रगतीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता, भौतिक सुविधा, कर्मचारी मानधनवाढ, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, गाळेधारकांचा करारनामा, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील दालनामध्ये फर्निचर व इतर सुविधा संदर्भातही निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, समिती सदस्य, क्रीडा अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000