ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनाने कलाकारांचा मार्गदर्शक हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 24 : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनाने कलाकारांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका अशा विविध माध्यमांत जयंत सावरकरांनी स्वतःच्या चतुरस्र अभिनयाचा अनोखा ठसा उमटवला आहे. ते स्वतः जसे एक उत्तम चतुरस्र अभिनेता होते तसेच ते अनेक कलाकारांचे अभिनय क्षेत्रातील मार्गदर्शक होते.

जयंत सावरकर यांनी अनेक माध्यमातून विविध धाटणीच्या भूमिका केल्या. त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांनी नवीन कलाकारांना नेहमीच करून दिला. एक विचारवंत कलाकार म्हणून स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली होती. स्वतःच्या वैचारिक भूमिकांवर ते नेहमी ठाम राहिले. मात्र तरीही त्यांनी अन्य सहकलाकार आणि कर्मचाऱ्यांसोबत व्यक्तिगत मैत्री सदैव सांभाळली. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात मंत्री श्री.  मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/