रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 903

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव, मालोजीराजे यांची गढी सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करावे – केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका) :- घृष्णेश्वर मंदिराजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव, त्यातील संगित कारंजे, मालोजीराजे भोसले यांची गढी या ऐतिहासिक वास्तुंचे सुशोभिकरण लवकर पूर्ण करुन तसेच देखभाल, दुरुस्ती, कार्यान्वयन या प्रक्रिया पूर्ण करुन या वास्तू पर्यटकांना खुल्या कराव्या,असे निर्देश केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकल्पाचा आढावा डॉ. कराड यांनी घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, घ्रुष्णेश्वर मंदिर व्यवस्थापन इ. अधिकारी उपस्थित होते.

हा प्रकल्प उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविण्यात येत आहे. त्यात वेरुळ येथील घ्रुष्णेश्वर मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव येथे संगीत कारंजे तसेच ध्वनी व प्रकाश सादरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामांच्या उर्वरीत तांत्रिक पूर्तता करुन हा प्रकल्प पर्यटकांना खुला करावा. तसेच मालोजीराजे यांच्या गढीचे सुशोभिकरण पूर्ण करावीत. ही कामे पुरातत्व विभागाच्या निर्देशाप्रमाणे व त्यांच्या मान्यतेने पूर्ण करण्यात यावी व पर्यटकांना खुली करावी, असे निर्देश डॉ. कराड यांनी दिले.

०००००

राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणार जुन्नर येथील ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव-२०२४’

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि आदर्श विचाराने  कार्यक्षम, प्रगतीशील प्रशासन स्थापन करून मराठी साम्राज्याचा पाया घातला. युद्धशास्त्रात अनेक नवनवीन संकल्पना रुजविल्या. आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली विकसित केली. असे महान राजा, अवघ्या मराठी मनाची अस्मिता,आपले अराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९४ वी जयंती आपण  दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी  करत आहोत त्याचबरोबर श्री  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्षे साजरे  करत आहोत. दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४  दि.१७ ते १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत आहे.

राज्यातील गड-किल्ले विकासाला चालना देणार : पर्यटन मंत्री गिरीश महाजन

पर्यटनमंत्री गिरीश महाजन म्हणाले, मराठी साम्राज्याचा इतिहास आणि आपली संस्कृती राज्यातील 400 पेक्षा जास्त असलेल्या गड-किल्ल्यांच्या अवतीभोवतीच आहे. आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने, ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ साजरा करत आहोत. तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला सर्वांनी जरूर यावे.

राज्यात असलेले गिरीदुर्ग, भूदुर्ग, जलदुर्ग यांच्या जतन आणि संवर्धनासाठी  केंद्र शासन व राज्य शासनाचे वेगवेगळे कायदे आहेत. केंद्र व राज्य शासनाकडे नोंद असलेल्या आणि खासगी मालक असलेली ठिकाणे वगळून किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर नोंद न झालेल्या किल्ल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. राज्यातील किल्ल्यांच्या विकासकामांना शासन प्राधान्य देत आहे. गड -किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्यालगत पर्यटकांसाठी कॅराव्हॅन कॅम्पिंग, टेन्ट कॅम्पिंग, व्हर्च्युअल रियालिटी च्या माध्यमातून पर्यटकांना गडकिल्ल्यांचा इतिहास सांगता येईल. शिल्प स्वरूपात इतिहास प्रदर्शन उभारणे ही कामे केली जात आहेत. किल्ले पर्यटन धोरण अंतर्गत ही विविध कामेही करण्यात येत आहेत. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये अकरा गड – किल्ले आहे. तर जगभरातील पर्यटक आपल्या देशात येऊन पर्यटनात वाढ होईल. पर्यटनासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर आणि प्रादेशिक पर्यटन योजनांच्या माध्यमातून गड किल्ले विकासाला चालना देण्यात येत असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ चे भव्य आयोजन

पर्यटन विभाग पर्यटनाला चालना देण्यासाठी कॅलेंडरवर आधारित विविध पर्यटन उपक्रम राबवत आहे. याच उपक्रमातंर्गत शिवजयंती देखील उपक्रम घेतला असून गेल्या वर्षी  शिवजयंतीला तीन दिवस ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’ मोठ्या उत्साहात साजरा केला.

यंदाही ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ मध्ये तीन टेन्ट सिटी, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती व रांगोळी स्पर्धा, गिर्यारोहण प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन,खाद्य महोत्सव विविध स्पर्धा,मंदिर दर्शन,सरोवर निवास, मंदिर दर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून  आपला इतिहास आणि संस्कृती याची माहिती, आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 राज्यातील गड व किल्ले जतन आणि संवर्धन

मराठा शासन काळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला,या पराक्रमांची साक्ष देणारे महाराष्ट्रातील अभेद्य किल्ले आजही आपल्याला त्यांच्या अस्तित्वातून आपल्या गतवैभवाची साक्ष देतात. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. गडकिल्ले हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. राज्यात जवळपास ४०० किल्ले  आहेत यामध्ये गिरीदुर्ग, भुदुर्ग, जलदुर्ग आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे ४७ किल्ल्यांची नोंद आहे. तर राज्य पुरातत्व विभागाकडे ५१ किल्ल्यांची नोंद आहे या व्यतिरिक्त महसूल व वन विभागाकडे दोन्ही वगळून ३३७ किल्ल्यांची नोंद आहे यामध्ये काही खासगी मालकीचे पण किल्ले आहेत.किल्ल्यांचे जतन आणि संवर्धंन व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य यांचे स्वतंत्र कायदे आहेत. केंद्र शासनाने राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी राज्याला परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

केंद्र व राज्य शासनाकडे नोंद असलेल्या आणि खासगी मालक असलेली ठिकाणे वगळून किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर नोंद न झालेल्या किल्ल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. राज्यातील किल्ल्यांच्या पायथ्यालगत पोहोच रस्ता, पर्यटकांसाठी माहिती केंद्र,पार्किंग, माहिती फलक, स्वच्छता गृह, पर्यटन स्थळ माहिती केंद्र, परिसर सुशोभीकरण, स्थानिक खाद्य पदार्थ  व वस्तू विक्री केंद्र या कामांना प्राधान्य देण्याचा  शासनाचा मानस आहे. पर्यटनासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर आणि प्रादेशिक पर्यटन योजनांच्या माध्यमातून गड किल्ले विकासाला चालना देण्यात येत आहे.

किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी प्रयत्न करणार

पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत पर्यटन विभागाने किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. या परिसरातील कृषी पर्यटन केंद्राना नोंदणी प्रमाणपत्रही दिले आहे. जुन्नर तालुका हा २१ मार्च २०१८ मध्ये विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे पर्यटन धारेण २०१६ अंतर्गत विशेष पर्यटन क्षेत्रांना  विविध सवलती दिल्या जातात.

किल्ले शिवनेरीवरील विकासासाठी भविष्यात केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींमध्ये बदल करून रायगड किल्ल्याप्रमाणे या किल्लाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच भविष्यात किल्ल्याच्या पायथ्यालगत पोहोच रस्ता, पर्यटकांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित माहिती केंद्र, पार्किंग, माहिती फलक, स्वच्छता गृह लाईट आणि साऊंड शो, परिसर सुशोभीकरण ही कामे करण्यात येणार आहेत.

गड – किल्ल्यांसाठी भविष्यकालीन योजना

नव्या पिढीपर्यंत किल्ले आणि इतिहास पोहोचावा यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या सहली आयोजित करणे. एनसीसी, एनएसएस आणि एमसीसी या विद्यार्थ्यांचे कॅम्प गडकिल्ले ठिकाणी आयोजित करणे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने वनसंवर्धन करणे, स्थानिक ठिकाणी निवास न्याहरी योजनांना प्रोत्साहन देणे. राज्यातील किल्ल्यांची आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी करणे यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने गाजलेले गडकिल्ले येणार

 जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले महाराष्ट्रातील ११ गडकिल्ले युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये किल्ले रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे रणझुंजार कर्तृत्व आणि त्यांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले हे सर्व किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तुत्वावर आधारीत संग्रहालय आणि थीम पार्क

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वर्ष साजरे करण्यात येत असल्याने सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ठिकाणी पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित संग्रहालय आणि थीम पार्क  उभारण्याची घोषणा केली होती. यामध्ये गोराई, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, नाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान (थीमपार्क) आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली असून आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, छत्रपती संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.

या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीमपार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवसृष्टी उभारणे

राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो, हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटक व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मौ. वडज, ता.जुन्नर, जि.पुणे येथे जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन १६.८९ हेक्टर आर् मध्ये हे काम होणार असून या माध्यामातून त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाची माहिती त्यांनी केलेल्या  कार्याची संक्षिप्त माहिती पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी  महाराष्ट्र शासनाचा  पर्यटन विभाग स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर चला, इतिहासाच्या घटनांचा साक्षीदार असलेला ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024’ मध्ये तीन दिवस चालणाऱ्या  महोत्सवाच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होऊया…

शब्दांकन : संध्या गरवारे – खंडारे,

विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

****

वरुड-मोर्शी येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प संत्रा उत्पादकांसाठी गेमचेंजर ठरेल

मुंबई, दि. 15 : संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. हा प्रकल्प येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन वरुड-मोर्शी येथे  अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.

वरुड-मोर्शी (जि.अमरावती) येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे),  महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे संचालक मंगेश गोंदवले, पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. केदार जाधव, अमरावती कृषी विभागाचे सहसंचालक के. एस. मुळे, विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्यूसर कंपनीचे अमित जिचकर यांच्यासह महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ आणि पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, अमरावती विभागात संत्रा लागवडीचे क्षेत्र जास्त आहे, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रास्तभाव मिळणे गरजेचे आहे. संत्र्यांवर अत्याधुनिक सयंत्राद्वारे प्रक्रिया करून ज्यूस कॉन्सट्रेट, इसेन्स‍ियल ऑइल, पिल पावडर, पशु खाद्य, ज्यूस, टेट्रापॅक ज्यूस, पेंट बॉटल इत्यादी प्रकारची वेगवेगळी उत्पादने केल्यास संत्रा फळाची मूल्यवृद्धी होऊन त्यापासून शेतकऱ्यांना चांगला अतिरिक्त मोबदला मिळू शकतो. त्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वरुड-मोर्शी येथे विदर्भ अॅग्रोव्हिजन प्रोड्यूसर कंपनी आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळासोबत भागिदारीद्वारे संयुक्त उपक्रम म्हणून संत्रा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येईल. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

*****

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक : 15 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार दिव्यांगांसाठी सातत्याने कार्यरत आहे. याअनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक जिल्ह्यातील एक हजार ३९७ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे दूरदृष्टीप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर आमदार प्रा. देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) चे व्यवस्थापक अजय चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, संपूर्ण देशात ६९ ठिकाणी “सामाजिक अधिकारीता शिबिराचे” आयोजन करण्यात आले असून या शिबिरांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  या शिबिरासाठी एलिम्कोच्या वतीने २६ ऑक्टोबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली होती.

या शिबिरांमध्ये दिव्यांग बांधवांना नोंदणी करता यावी यासाठी प्रशासनामार्फत तंत्रज्ञानाचा वापर करून एक ॲप्लीकेशन विकसीत करण्यात आले आहे, ही कौतुकाची बाब आहे. या ॲप्लीकेशन मध्ये नोंदणी केल्यानुसार दिव्यांग बांधवांना आवश्यकतेनुसार एलिम्को कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साहित्य तयार केले आहे. दृष्टिबाधित दिव्यांग बांधवांसाठी स्मार्ट मोबाईल व स्मार्ट केन (काठी) तयार केली आहे. या काठीचा वापर करतांना 3 मीटर अंतरावर असलेल्या अडथळ्यांची सूचना संबंधित दिव्यांग व्यक्तीला मिळणार आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तिकरण विभागाच्या वतीने वाटप होणारे साहित्य दिव्यांगांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. एलिम्को कंपनी मार्फत देण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती दिव्यांग बांधवांनी जाणून घ्यावी, ज्यामुळे सहाय्यक साहित्याचा वापर करणे सहज शक्य होईल.म्हणूनच जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांना त्यांनी नोंदणी केल्याप्रमाणे आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून कोणीही दिव्यांग व्यक्ती यापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी केंदीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल यांनी सांगितले, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 26 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली होती. त्यातील पात्र ठरलेल्या एकूण दोन हजार 287 लाभार्थ्यांपैकी जिल्ह्यातील नाशिक, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, देवळा, कळवण, सुरगाणा, पेठ, निफाड व येवला या 10 तालुक्यातील एक हजार 397 लाभार्थ्यांना साधारण 7 ते 8 कोटी रुपयांच्या कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित ५ तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना नंतरच्या टप्प्यात कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांग व्यक्ती व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. दिव्यांगांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरेल असे दर्जेदार साहित्य त्यांना पुरविण्यात आले आहे. त्याचा उपयोग त्यांनी कसा करावा याबाबतची माहिती देखील त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एलिम्को कंपनीचे व्यवस्थापक अजय चौधरी यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्येकी दोन इलेक्ट्रीक ट्रायसिकल, व्हिल चेअर, श्रवण यंत्र, दृष्टिबाधितांसाठी स्मार्ट मोबाईल व स्मार्ट केन (काठी) साहित्याचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करून योग्य कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले.

00000000

‘चांदा ते बांदा’ योजनेला मिळणार गती

मुंबई, दि. 15 : चांदा ते बांदा योजनेंतर्गत सर्व कामे गतीने करावीत. पर्यटन विभागाचा  या योजनेसाठी उपलब्ध असलेला निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळण्यासाठी पर्यटन विभागाने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले.

चांदा ते बांदा योजनेंतर्गत मंत्रालयात आयोजित बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभाच्या सचिव शैला ए, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, शालेय शिक्षण विभाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकिय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सिंधुदुर्ग  जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यात असलेले प्रत्येक पर्यटन स्थळ विकसित झाले, तर येथील पर्यटनाला सर्वाधिक वाव मिळेल. स्थानिक ठिकाणी विकासाला चालना मिळून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला चांगल्या सुविधा मिळावे त्यासाठी चांदा ते बांदा योजनेतील सर्व कामे गतीने करावी. बांधा, वापरा, हस्तांतरित करा या भागातील पर्यटनाचा विकास करावा.

चांदा ते बांदा योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शिल्प ग्राम, हेल्थ पार्क भोसले उद्यान व रघुनाथ मार्केट, स्पाइस व्हिलेज(वेंगुर्ला), दिशादर्शक फलक ही कामे पूर्ण आहेत. या योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या योजनेतील उर्वरित सर्व कामे पुढील एक वर्षात पूर्ण करायची आहेत.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे पर्यटन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी 25 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. उर्वरित कामांमध्ये रेल-ओ- टेल (सावंतवाडी रोड), महाराष्ट्र गोवा सीमेवरील सुशोभीकरण. (बांदा), आंबोली येथील साहसी क्रीडा प्रकार, जंगल सफारी, फुलपाखरू उद्यान ही कामे, नवाबाग फिशिंग व्हिलेज (वेंगुर्ला), नरेंद्र डोंगर (सावंतवाडी), यशवंत गड (दोडामार्ग), भरतगड किल्ला (मसुरे, मालवण), नापणे (वैभववाडी) व सावडाव धबधबा (कणकवली), कर्ली खाडी (तारकर्ली, मालवण), तिल्लारी धरण (दोडामार्ग), आरोंदा खाडी (शिरोडा), निवती -(वेंगुर्ला), मोनोरेल (सावंतवाडी भोसले उद्यान) या चांदा ते बांधा योजनेतील पर्यटन विभागाशी संबंधित कामासाठी उपलब्ध निधी मार्च 2025 पर्यंत खर्च करण्यासाठी मान्यता मिळावी, अशी सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

‘महाखादी कला-सृष्टी २०२४’ चे १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, १५ :- स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या महावस्त्राने केले. खादीला आजही मोठी मागणी आहे. खादी उद्योगातील लघु उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, आदिवासी विकास विभाग, भारतीय लघु उद्योग विकास बॅंक, खादी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाखादी कला-सृष्टी २०२४’ चे आयोजन १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या एक्स्पोचे उद्घाटन १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए च्या मैदानावर होणार आहे.

या कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार, खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, खासदार पूनम महाजन, आमदार झिशान सिद्दिकी, उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, भारतीय लघु उद्योग विकास बँकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रामन, महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला उपस्थित राहणार आहेत.

या एक्स्पोमध्ये खादी वस्त्रांच्या सोबतच महाराष्ट्रातील लघु उद्योजकांची निर्मिती असलेल्या पैठणी, हिमरु शाल, बांबूच्या वस्तु, वारली पेंटिंग, महाबळेश्वर मधुबन मध, कोल्हापुरी चप्पल, मसाले, केळीचे विविध पदार्थ इत्यादींसोबतच महाराष्ट्रातील विविध पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. कापड उद्योग आणि फॅशन इंडस्ट्री याची वाढ आणि विकास यावरील चर्चासत्रे, परिसंवाद याशिवाय  फॅशन शो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. तसेच याठिकाणी उभारण्यात येणा-या ‘एक्सपिरीएंस सेंटर’ मध्ये   चरख्यावरील सूतकताई, हातमागावर कापड निर्मिती, बांबूच्या वस्तुची निर्मिती आदींचा प्रत्यक्ष अनुभव आणि प्रात्यक्षिक १६ ते  २५ फेब्रुवारी दरम्यान अनुभवता येणार आहे.  नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

००००

मनिषा सावळे/विसंअ

‘एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि.१५:-पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या  उपक्रमाची दखल घेऊन महामंडळाला प्रतिष्ठित  ‘स्कोच’च्या (SKOCH) रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे हा पुरस्कार सोहळा झाला. ‘एमटीडीसी’च्या अधिकारी मानसी कोठारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्कोच (SKOCH) समूह हा 1997 पासून सर्वसमावेशक वाढीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक-आर्थिक समस्या हाताळणारा भारतातील अग्रगण्य थिंक टँक आहे. हा समूह देशाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. हा समूह विविध शासकीय संस्था, खाजगी संस्था यांच्याशी संलग्नित आहे.

पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन सचिव जयश्री भोज यांनी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, एमटीडीसी अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.

‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम पर्यटनमंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली, पर्यटन सचिव श्रीमती भोज आणि एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.  एमटीडीसीची ३० पर्यटन निवासे, २९ उपहारगृहे, २ बोट क्लब आणि २ अभ्यागत केंद्रे, आयआयएसडीए (Indian institute of scuba diving and aquatic) स्कूबा डायव्हिंगसाठी ओळखली जाणारी आणि जलक्रीडांना समर्पित आयआयएसडीए, अजिंठा वेरुळ अभ्यागत केंद्र, वॉटरपार्क या ठिकाणी या उपक्रमाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.

घारापुरी लेणी (एलिफंटा), खारघर, टिटवाळा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा, फर्दापूर, अजिंठा टी पॉईट, लोणार, गणपतीपुळे, तारकर्ली, इसदा, वेळणेश्वर, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, महाबळेश्वर, कार्ला, पानशेत, माळशेज घाट, माथेरान, भिमाशंकर, कोयना, नागपूर, ताडोबा, बोधलकसा, वर्धा, सिल्लारी, भंडारदरा, शिर्डी, ग्रेप पार्क, बोट क्लब नाशिक, चिखलदरा इ. ठिकाणी ‘जबाबदार पर्यटन’ या उपक्रमांतर्गत ‘एमटीडीसीची’ पर्यटक निवासे आहेत.

पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, रोजगाराला चालना मिळावी यासाठी ‘एमटीडीसी’ सदैव प्रयत्न करत आहे.  उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून, इतर कोणताही खर्च न करता एमटीडीसी हा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. ‘जबाबदार पर्यटन’ अंतर्गत स्वच्छता मोहीम, पर्यटकांसाठी माहितीपूर्ण फलक, कोणतेही संरक्षक किंवा कृत्रिम पदार्थ किंवा कृत्रिम रंग नसलेल्या आरोग्यदायी आहारावर लक्ष केंद्रित करणे आणि एमएसजी, प्लास्टिक चा वापर टाळणे, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम करत आहे. एमटीडीसीच्या ‘भूमिपुत्र’ धोरणाद्वारे रोजगार आणि पर्यटन प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पर्यटन उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.

‘जबाबदार पर्यटन’ मध्ये शाश्वत संसाधन व्यवस्थापन, नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समुदाय सहभाग यासारख्या पद्धतींचा समावेश आहे. ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम वन्यजीव सफारीला प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक वाहतूक पर्यायांद्वारे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करत आहे. याव्यतिरिक्त स्थानिक समुदायांकडून वस्तू आणि सेवा मिळवून स्थानिक अर्थव्यवस्थांना बळकटी मिळत आहे.  पर्यटन स्थळांची सखोल माहिती देणे, पर्यटकांमध्ये जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि भागधारकांसोबत सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील असून यामध्ये राज्याला अग्रस्थानी ठेवण्यासाठी  ‘एमटीडीसीचे महाव्यवस्थापक श्री. जयस्वाल प्रयत्नशील आहेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ

संत सेवालाल महाराज जयंतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 15 : बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी हा अभिवादन कार्यक्रम झाला.

संत सेवालाल महाराज जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 15 : थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, दिनेश चव्हाण, कक्ष अधिकारी तुषार राठोड, शिवाजी चव्हाण, निलेश जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.

००००

प्रवीण भुरके/स.सं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. १५ :- संत सेवालाल महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...