शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 900

नवे संकेतस्थळ सांस्कृतिक कार्य विभागाला लोकाभिमुख करणारे ठरेल – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १६ :राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संकेतस्थळ विभागाच्या कार्यप्रणालीला लोकाभिमुख करणारे ठरेल. सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सर्वांसाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरणारे असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मंत्रालयात मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्य विभागाच्या https://cultural.maharashtra.gov.in/ या नव्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव  नंदा राऊत, अवर सचिव बाळासाहेब सावंत व सुमंत पास्ते, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे, दार्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर आदी यावेळी उपस्थिती होते.

या नव्याने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर विभागातील विविध कार्यासने, क्षेत्रीय कार्यालये, महामंडळे आदींची माहिती देण्यात आली आहे. यावेळी अधिनस्त कार्यालये असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पुराभिलेख संचालनालय, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, दर्शनिका विभाग, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य हिंदी-सिंधी- गुजराती साहित्य अकादमी, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव आणि कोल्हापूर चित्रनगरी यांची माहितीही देण्यात आली आहे.

याशिवाय, विभागांची एकत्रित माहिती. विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती, विविध कार्यक्रमांची छायाचित्रे आणि व्हिडिओच्या समावेशाने हे संकेतस्थळ वापरकर्त्यांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सांस्कृतिक विभागाच्या विविध योजना, पुरस्कार, स्पर्धा व शिबिरे, महोत्सव, प्रशिक्षण कार्यक्रम आदींची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

 

जुन्नरसह आंबेगाव येथील हिरडा पीक नुकसानभरपाई संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवावा – मंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई, दि. १६ : जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात सुधारित प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पाठवावा, असे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. हा प्रस्ताव प्राप्त होताच तो  मंत्रिमंडळासमोर ठेऊन मदतीबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मंत्रालयात आज मंत्री श्री. वळसे पाटील यांनी, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने बैठक झाली. मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जगताप उपस्थित होते. तर कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपवन संरक्षक प्रवीण सिंग आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, जुन्नर आणि आंबेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने येथील शेतकऱ्यांच्या हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी त्यांचे पंचनामेही करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना मदत मिळालेली नाही. ही मदत त्यांना मिळावी, यादृष्टीने त्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावेळ हिरडा पिकाचा बाजारभाव लक्षात घेऊन कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी प्रस्ताव तत्काळ सादर करावा.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांनी, विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येईल आणि त्यास मान्यता घेऊन या शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत केली जाईल, असे स्पष्ट केले. येत्या सोमवारपर्यंत याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाला सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील बाधित गावांची संख्या ८१ असून शेतकऱ्यांची संख्या ४१८९ इतकी आहे. केंद्राच्या आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मध्ये याबाबत मदत करण्यास अडचण येत असल्यास विशेष बाब म्हणून ती करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

 

पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना लाभ – मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. १६ :- पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्प, कुकडी व डिंभे प्रकल्प, भामा आसखेड प्रकल्प, निरा देवधर प्रकल्प, गुंजवणी प्रकल्प, आरळा कळमोडी प्रकल्प आणि बोपगाव रायता पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणे या निर्णयामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्जासह, त्यांच्या जमिनींचे  खरेदी – विक्री व्यवहार करणे सुलभ होणार असून अन्य शेतीविषयक योजनांचा लाभ घेता येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव असलेले शेरे उठविण्याबाबत १८ जानेवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. यानुसार पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामधील गटांवरील ज्या स्लॅबपात्र खातेदारांच्या/भूधारकांच्या जमिनींना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत किंवा भविष्यात उपलब्ध होणार आहेत, परंतु जमिनींचा संपादन निवाडा किंवा संपादन अद्यापर्यंत करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी विभागीय आयुक्त, पुणे यांनी  केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने “पुनर्वसनासाठी राखीव” असे ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात नोंदविलेले शेरे कमी करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

“पुनर्वसनासाठी राखीव” असे ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात नोंदविलेले शेरे कमी करताना गटांमधील क्षेत्राच्या भूसंपादनाबाबतची कार्यवाही झालेली नाही, तसेच भुसंपादन निवाडा घोषीत झालेला नाही, याबाबत खातरजमा जिल्हाधिकारी पुणे यांनी करावी. तसेच ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नमूद क्षेत्रावरील पुनर्वसनासाठी राखीव शेरा उठविणेबाबत प्रस्तावित केलेल्या अर्जदार यांच्या हिश्यापुरते असणाऱ्या क्षेत्रावरीलच पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा उठविणेबाबतची कार्यवाही करावी, असे शासन परिपत्रकात नमूद केले आहे.

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/02/202402151417483319.pdf”]

0000

एकनाथ पोवार/विसंअ/

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात २१ ते २५ फेब्रुवारी कालावधीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करावे – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, ‍‍दि. 16 : आदिवासी समाज बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसंदर्भात लाभार्थ्यांना  लाभ देण्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करावे, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या.

मंत्रालयात मंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प कार्यालयातंर्गत लाभार्थी मेळाव्याच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री डॉ. गावित बोलत होते.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, केंद्र व राज्य शासनातर्फे आदिवासी समाजातील अनुसूचित जमाती वर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी लाभार्थ्यांना न्युक्लिअस बजेट योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, शबरी घरकुल योजना या योजनांसह विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन तसेच पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ याठिकाणी देण्यात येणार आहेत.

21 फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी येथे 22 फेब्रुवारी, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी 23 फेब्रुवारी रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर 24 फेब्रुवारी, यवतमाळ जिल्ह्यातील राजुरा, वरोरा, झरीजामनी आणि 25 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, कळंब येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंत्री डॉ.गावित यांनी केले आहे.

या बैठकीस प्रकल्प अधिकारी गडचिरोली राहुल कुमार मीना, प्रकल्प अधिकारी भामरागड आदित्य जीवने, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव मच्छिंद्र शेळके तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती, दि. १६:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

श्री.पवार यांनी कन्हेरी वन विभाग, जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नटराज मंदिर परिसरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली.

यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव , उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

नटराज मंदिर परिसरातील कॅनालच्या समांतर असलेले पदपथ स्वच्छ राहतील याची दक्षता घेतानाच सार्वजनिक कामांचे विद्रूपीकरण करणाऱ्यावर पोलिसांनी कार्यवाही करावी. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम अंतिम आराखड्याप्रमाणे पूर्ण करावे. परिसरातील रस्त्याचा विचार करुन पुरेशा उंचीच्या संरक्षक भिंती उभाराव्यात.

कन्हेरी वनविभागात सरळ वाढणारी, सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा आणि ती झाडे जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोयीस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. कामे झाल्यानंतर ती नैसर्गिक वाटली पाहिजेत. या सर्व सार्वजनिक कामांसाठी अत्याधुनिक दर्जाच्या साहित्याचा वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई दि. १६: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपूर्द केला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्यदेखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकामी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा   सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पिटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलदगतीने पार पडले.

या कामकाजाकरिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच राज्यातील जमीन अधिग्रहण, जमीन धारणा, जमाबंदी, भूमी अभिलेख, तसेच शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचे प्रमाण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाण इत्यादी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवांनी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली. तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहितीसुद्धा आयोगास उपलब्ध करून देण्यात आली. याव्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्यांविषयीचीसुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली.

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करीत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात  टिकले, मात्र दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नव्हते. आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पावले वेळोवेळी उचलली आहेत. आयोगाने विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण केले असून मला विश्वास वाटतो की, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या  आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल.

आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पावले उचलली आहे. आयोगाने आज विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केला आहे. २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशनदेखील आम्ही बोलाविले आहे. हे सर्व पाहता आपले आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घ्यावे असे आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आज अहवाल देतेवेळी मुख्य सचिव डॉ नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयोगाचे सदस्य अंबादास मोहिते, ओमप्रकाश जाधव, मच्छिंद्रनाथ तांबे, ज्योतिराम चव्हाण, मारुती शिंकारे, डॉ गोविंद काळे, डॉ गजानन खराटे, नीलिमा सरप(लखाडे), सदस्य सचिव आ.उ. पाटील आदी उपस्थित होते.

पुरस्कांरांमधून आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 15 : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सारख्या पुरस्कारांमुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे समाजामध्ये चांगले काम करण्याची प्रेरणा आणखी लोकांना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह उद्योगपती मुकेश अंबानी, लोकमत समूहाचे विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, ऋषी दर्डा, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते जितेंद्र, रणबीर कपूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजामध्ये अनेक लोक विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत असतात असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पण प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या लोकांना व त्यांची कामगिरी समाजासमोर आणण्याचे काम अशा पुरस्कारांच्या माध्यमातून लोकमत समूह करीत आहे. या पुरस्कारांमुळे समाजातील नवीन पिढीला समाजासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत राहते.  लोकमत समूहाचे काम फक्त बातम्या देण्याइतके मर्यादित नसून अनेक समाजोपयोगी कामे या समूहामार्फत केली जातात. राज्यातील गुणवंतांचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देण्याची चांगली परंपरा लोकमत समूह जपत असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात विविध विकास कामे सुरु आहेत. तसेच अनेक विकास प्रकल्प शासनाने पूर्ण केले आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा विकास वेगाने सुरू आहे. 22 किलोमीटर लांबीच्या अटल सेतुमुळे रायगड – मुंबई अवघ्या 15 मिनिटांत पोहोचता येते. समृद्धी महामार्गामुळे नागपूर – मुंबई प्रवास 7 तासांचा झाला आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने असे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. थेट परकीय गुंतवणुकीमध्येही राज्य प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छतेचाही प्रथम पुरस्कार राज्याला मिळाला आहे. हे सर्व राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री उत्कृष्ट काम करत असल्यामुळेच शक्य झाले आहे. तसेच राज्याचे अधिकारीही लोककल्याणासाठी उत्कृष्ट काम करत आहेत. राज्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या या लोकांना लोकमत समूहाने आज पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्याबद्दल मी लोकमत समूहाचे अभिनंदन करतो असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग 

            मुंबईदि. 15 : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला  चालना मिळणार आहे. प्रकल्पासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून याबाबत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला.

            बैठकीस खासदार संजयकाका पाटीलमुख्य सचिव नितीन करीरमित्राचे सीईओ प्रवीण परदेशीजागतिक बँकेचे प्रतिनिधीनाबार्ड अधिकारी तसेच विविध विभागांचे सचिवअधिकारी उपस्थित होते.

            जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यात जोखीम गृहित धरुन जलव्यवस्थापनपूर व्यवस्थापनसंस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्याचा मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत  म्हणाले की,  याशिवायनाबार्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 37 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 4 हजार 643 कोटी रुपये खर्च येणार असूनसिंचनक्षमता वृद्धीसाठी 155 प्रकल्पांच्या कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी 5 हजार 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.

            पहिल्या टप्प्यात ही सुमारे 10 हजार कोटींची कामे केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 38 अपूर्ण प्रकल्प पूर्णत्त्वास नेली जाणार आहेत. अशी एकूण 15 हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेतअसेही त्यांनी सांगितले.

             बळीराजा जलसंजीवनी योजना तसेच प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेत समाविष्ट नसलेल्या या प्रकल्पांसाठी 2019 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता.

              आता नव्याने सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे सिंचन प्रकल्पांना गतीने पूर्ण करता येईल. शिवायनियमित अर्थसंकल्पावर त्याचा भार पडणार नाही.

निलेश तायडे/विसंअ/

 

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  दि. 31 जानेवारी, 2024 असा होता. या प्रवेशिका मागविण्याकरिता दि.29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच http://13.200.45.248 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

000

ज्येष्ठ नागरिकांच्या आनंददायी जीवनासाठी ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबत उपक्रम राबविणार – विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड

छत्रपती संभाजीनगर दि. 15: आपल्या पाल्यांपासून दुर्लक्षितव हक्कांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृध्दापकाळातील आयुष्य सुखकर, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविधयोजना व कायदेशीर तरतुदी यांचा समन्वय साधून ज्येष्ठांना दिलासा देणारा ज्येष्ठ नागरिक मालमत्ता हक्काबाबतचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी आज सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त श्री.अर्दड यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त नयना बोंदर्डे, उपायुक्त अनंत गव्हाणे, उपायुक्त जगदिश मिनियार, उपायुक्त सुरेश बेदमुथा, नगरपालिका प्रशासन उपायुक्त ॲलीस पोरे सामाजिक कार्यकर्त्या डॉ. पदमा तापडीया विविध विभागाचे विभागप्रमुखउपस्थित होते.

विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड म्हणाले, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, कुशीत वाढवले, मोठे केले, प्रेमाचा वर्षाव केला त्या वृध्द आई- वडीलांनाआयुष्याच्या शेवटी केवळ स्वार्थ, मोह, तिरस्कार, मत्सर व अहंकारातून अथवा गैरसमजातून बऱ्याच ठिकाणी त्रास देण्याच्या घटना समाजामध्ये घडत असल्याचे दिसून येते. घरातील एक अडगळ म्हणून वृध्दांकडे बघण्याऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णयान्वये “राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठनागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडून विभागनिहाय निर्देश यापुर्वीच निर्गमीतकेले असल्याचे त्यांनी सांगितले.

आई-वडील, ज्येष्ठ नागरिक यांच्या वृध्दापकाळात त्यांच्यामुलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा व त्याच बरोबर इतर मुलभूत सोईसुविधा यामध्ये वैद्यकीय उपचार, घरामध्ये सन्मानाची वागणूक या बाबी उपलब्ध व्हाव्यात,या हेतूने भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक, पालकांना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी आई-वडीलांचा व ज्येष्ठ नागरीकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, 2007 हा कायदा अस्तित्वात आणला आहे. अधिनियमाप्रमाणे जे आई-वडील व ज्येष्ठ नागरिक हे आपल्या स्वतःच्या उत्पन्नामधून किंवा स्वतःच्या मालमत्तेमधून स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ ठरतात. असे आई-वडील तसेच ज्येष्ठ नागरिक ज्यांना अपत्य आहे, ते त्यांच्या मुलांविरुध्द, नातवाविरुध्द व जे ज्येष्ठ नागरिक निपुत्रिक आहे ते उक्त अधिनियमाच्या कलम 2 (छ) मध्ये नमुद”नातेवाईक’ या संज्ञेत बसणाऱ्यांविरुध्द नर्वाह प्राप्त करण्यासाठी अधिनियमातील कलम 5 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज करु शकतात, अशी तरतूद असल्याचे श्री. अर्दड यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक यांना सन्मानाने जीवन जगता यावे या दृष्टीने त्यांच्या गरजांच्या मर्यादेत त्याचा निर्वाहभत्ता चालविणे हे मुलांचे व कलम 2 (छ) मध्ये नमुद नातेवाईकांचे दायित्व निश्चित केलेआहे. अधिनियमातील तरतूद क्रमांक 5 प्रमाणे ज्येष्ठ नागरिक  आई-वडीलांच्या किंवा आजी- आजोबांच्या बाबतीत अज्ञान असणाऱ्या त्यांच्या एका किंवा अधिक मुलांविरुध्द व निपुत्रिक ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत कलम 2 (छ) प्रमाणे नातेवाईक असणाऱ्यांच्या ताब्यात अशा ज्येष्ठ नागरिकांची मालमत्ता असेल किंवा अशी मालमत्ता या ज्येष्ठ नागरिकांकडून वारसा हक्काने त्याला मिळणार असेल अशा नातेवाईकाविरुध्द निर्वाह प्रदान करण्याच्या अनुषंगाने अर्ज सादर करता येणार असल्याचेही विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले.

अधिनियमाच्या कलम २३ प्रमाणे या अधिनियमाच्या प्रारंभ नंतर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी एखाद्या व्यक्तीला तो त्या ज्येष्ठ नागरिकाला मुलभूतसुविधा पुरवेल या शर्तीस अधीन राहून दान अथवा अन्य प्रकारे आपली मालमत्ता हस्तांतरितकेली असेल आणि त्या व्यक्तीने त्या ज्येष्ठ नागरिकाला मुलभूत सुविधा पुरविण्यास नकारदिला असेल किंवा तो त्यासाठी असफल ठरलेला असेल तर असे झालेल्या मालमत्तेचे हस्तांतरण लबाडीचे किंवा जबरदस्तीने किंवा गैरवाजवीप्रमाणे केले असल्याचे मानण्यात येईल व न्यायाधिकरणात असे हस्तांतर अवैध आहे असे घोषित करता येईल अशी तरतूद असल्याचा उल्लेखही श्री. अर्दड यांनी केला.

अधिनियमातील कलम 2 (छ) नुसार “नातेवाईक” या व्याख्येतअसणाऱ्या व निर्वाह भत्त्याच्या लाभापासून वंचित असणाऱ्या गरजू ज्येष्ठ नागरिकांची वारसा हक्कात असलेली अथवा स्व अर्जित मालमत्ता ज्या पाल्यांच्या ताब्यात असेल, हस्तांतरित करण्यात आली असेल अशा पाल्यावर दायित्व निश्चित करणे आवश्यक आहे तसेच सदर अधिनियमातील कलम 5 प्रमाणे दायित्व असलेल्या ज्येष्ठांचे संगोपण न करणाऱ्या, संगोपणास प्रतिसादन देणाऱ्या पाल्यांच्या विरुध्द सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झाल्यास अधिनियमातील कलम 23 मधील प्रचलित तरतुदी विचारात घेत अशा वंचित ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कामध्ये प्रशासकीय पातळीवरुन निर्णय घेण्याची गरज असल्याचे श्री. अर्दड यांनी स्पष्ट केले.

असा राबविणार उपक्रम

मराठवाड‌्यात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व तलाठी सजा अंतर्गत ६० वर्षे व त्यावरील वय असलेल्या आई वडील व ज्येष्ठ नागरिकाना”आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ या कायद्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे अधिनस्तउप विभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी व तलाठी सजा यांचेमार्फत आवश्यक पाऊले उचलण्यात येणार आहेत.

महसुली अभिलेखात फेर बदल होत असताना किंवा वाटणीच्या आधारावर फेरबदल करताना संबंधित घरातीलआई-वडील, आजी-आजोबा व ज्येष्ठ नागरिक यांचा उदरनिर्वाह यासाठी योग्य तेवढी मालमत्ताठेवण्यात आली आहे किंवा कसे? किंवा फेर बदल करतांना पालकांच्या पुढील आयुष्यात काळजीसंदर्भाने अटी व शर्ती नमूद केल्या आहेत का ? या बाबी विचारात घेऊनच असा बदल करण्यात यावा. महसुली अभिलेखात फेर बदल अथवा वाटणीनंतर आई-वडील अथवा ज्येष्ठ नागरीकांची मुले (मुलगा-मुलगी) किंवा नातेवाईक त्यांची काळजी घेत आहेत का? याबद्दल तलाठी सजानिहाय खात्री करतील व या बाबीकडे लक्ष देवून कार्यवाही करतील.

उपक्रमाची अंमलबजावणी करताना जर संबंधित व्यक्तीचा मुलगा-मुलगी किंवा नातेवाईक त्यांच्या आई-वडीलांची, ज्येष्ठांची काळजी घेत नसतील किंवा त्यांना सन्मानाने आयुष्य व्यतीत करु देत नसतील व मालमत्ता हस्तांतराणाचे वेळी दिलेल्या शब्दाचे पालन करत नसतील, असे संबंधित आई-वडील, वयोवृध्द व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक जर तोंडी तक्रार करत असतील तर संबंधित तलाठी यांनीत्यांची लेखी तक्रार देण्यास मदत करुन आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याणअधिनियम, 2007 मधील तरतूद क्रमांक 23 प्रमाणे संबंधित मुलाकडून तसेच नातेवाईकांकडून संबंधित मालमत्ताधारक ज्येष्ठांना मालमत्तेचा पुर्नहक्क देण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यासप्रस्ताव सादर करावा.

जर सबंधित व्यक्तीचा मुलगा-मुलगी किंवा नातेवाईक यांच्याकडून आई-वडील किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या नावे पुर्नहक्काने मालमत्तेची नोंद घेतल्यानंतर अशा ज्येष्ठांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रसंगी असे आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचे चरितार्थ व कल्याणासाठी नियम, 2010 चे प्रकरण 6 मधील नियम 20 नुसार ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचेव मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत कृती आराखडा विनिर्दिष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची यादी संबंधित तलाठयांकडेअद्ययावत ठेवण्यासोबतच त्यांना महिन्यातून एकदा भेट द्यावी लागणार आहे.

राज्यात उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखालील निर्वाह प्राधिकरणामार्फत आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचे चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम आणि त्या अंतर्गत 23 जून, 2010 च्या अधिसूचनाअन्वये राज्यात लागू केलेले नियम, 2010 ची काटेकोर अंमलबजावणी करुन दुर्लक्षित व वंचितआई-वडील, ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह खर्च मिळवून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर संबंधीत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीने सदर उपक्रमाचे सुयोग्य नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. तालुका स्तरावर तहसिलदार याचे अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करुन सदर समितीची वेळोवेळी आढावा बैठक घ्यावी, तसेच सदरील कार्यवाही करतांना वयोवृध्द आई-वडील व ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित व वंचित राहणार नाहीत, निर्वाहच्या तक्रारी उद्भवणार नाहीत याबाबत सर्व संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी यांना जाणीव करुन द्यावी तसेच उपक्रमाशी निगडीत सर्व संबंधितांनी आपसांत योग्य समन्वय ठेवून हा उपक्रम त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत.

*****

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी

0
बारामती, दि.१९: शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा...

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...