रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 839

अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडविण्याचे काम – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर या समाजातील महत्वाच्या घटक आहेत. अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडविण्याचे काम होते, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत धनंजय गार्डन सांगली येथे आयोजित अंगणवाडी सेविका, मदतनिस यांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.  यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठी जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून 80 लाख रूपयांची तरतूद करून वयोगटनिहाय पुस्तके व वह्या छपाई करून वाटप करण्याचे काम चालू आहे. ग्रामीण भागातील 1 हजार 750 अंगणवाडी केंद्रांना वाढ सनियंत्रण साधने वजनकाटा पूरविणे ही योजना घेण्यात आली असून या योजनेस 3 कोटी 50 लाख रूपये इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 333 अंगणवाडी केंद्रांना ऑन ग्रीड सोलार सिस्टम बसविण्यासाठी 5 कोटी रूपये रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अंकूर प्रकल्पांतर्गत थ्रीडी अंगणवाडी तयार करण्यासाठी 3 कोटी 56 लाख रूपये इतक्या रक्कमेची योजना घेण्यात आली आहे.

        ग्रामीण भागातील अंगणवाड्यातील अनुसूचित जातीतील 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातीलज मुला-मुलींसाठी व किशोरवयीन मुली-मुलांसाठी, गरोदर स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार पुरविणे, मल्टी मिलेट पौष्टिक बिस्किटे पुरविणे या योजनेसाठी 1 कोटी रक्कमेची प्रशासकी मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत 115 लाभार्थींना मार्च 2024 अखेर लाभ आदा करण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेंतर्गत दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एकूण 516 मुलींना लाभ देण्यात येत आहे. अंगणवाडी सर्वेक्षणाबाबतची संपूर्ण माहिती भरण्यासाठी तसेच अंगणवाडी केंद्रातील नाविण्यपूर्ण उपक्रमाची प्रचार व प्रसिध्दीसाठी अंगणवाडी स्तरावर तारा ॲप व युट्यूब चॅनेल उपलब्ध करून दिले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

        खासदार संजय पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर यांच्याकडून समाजाची सेवा घडते. कोरोनाच्या अडचणीच्या काळातही त्यांनी अत्यंत चांगले काम करून नागरिकांना दिलासा दिला. त्यांचे  प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

        जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर नागरी, ग्रामीण भागात काम करीत असतात. गरोदर मातांना पोषण आहार देण्याचे काम अंगणवाडीमार्फत केले जाते. अंगणवाड्या सर्वंकष परिपूर्ण कशा होतील यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  संदीप यादव यांनी महिला मेळावा आयोजित करण्याचा हेतू विशद केला.

यावेळी कवठेमहांकाळच्या अंगणवाडी सेविका, मदतनिस यांनी मंगळागौरी खेळ, देशिंग च्या महिलांनी विठू माऊली गाण्यावर नृत्य सादर केले.

या कार्यक्रम प्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी माधवनगर येथील 5 वर्षाची मुलगी राधा डावखुरे, अंकुर बाल शिक्षण योजनेसाठी तासगाव तालुक्यातील वडगाव येथील 5 वर्षाचा मुलगा पार्थ पाटील तर लेक लाडकी योजनेसाठी वाळवा तालुक्यातील  9  महिन्यांची मुलगी उर्वी पाटील यांना ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून घोषीत करण्यात आले.

प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व मान्यवरांनी अंगणवाडी सेविका, मदतनिस यांच्यामार्फत बनविलेल्या विविध पौष्टीक खाद्य पदार्थांच्या लावण्यात आलेल्या स्टॉलना भेट देवून याबाबत त्यांनी महिलांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना विविध लाभ वाटप, तसेच  प्रातिनिधीक स्वरूपात अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

00000

भूमीअभिलेख विभागासाठीच्या १५ रोवर मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप

जळगाव,दि.14 (जिमाका) : भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे  शेत जमीन मोजणी  तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप  याद्वारे दिल्या जाणाऱ्या भूखंडाची तात्काळ मोजणी करता येवून जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहे.  बांधावरून भावकीचे आपापसात वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने‎ होणार असून शेतकऱ्यांना व प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव येथील नगरपालिका सभागृहात आयोजित जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी रोव्हर मशीन वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर, उपअधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे,नगर भुमापन अधिकारी पी. एस.पाटील उपस्थित होते.

जमीन मोजणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या‎ अडचणी आणि भूमिअभिलेख‎ कार्यालयातील तोकडे मनुष्यबळ या‎ बाबींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची‎ होणारी अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांनी यावर्षी प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे पंधरा रोवर मशीन वाटप करण्यात आल्या. यासाठी १ कोटी ८० लक्ष निधीची जिल्हा नियोज मधून तरतूद करण्यात आली, तर मागील वर्षी १२‎ आधुनिक जमीन मोजणी यंत्रे‎ भूमिअभिलेख कार्यालयास‎ देण्यात आली आहेत.  यासाठी १ कोटी‎ २० लाख निधी खर्च केले गेला होता.

भूमिअभिलेख कार्यालयातर्फे‎ जिल्ह्यातील सर्व जमिनींच्या‎ अभिलेख्यांचे जतन करण्यासह‎ नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या‎ जमिनींचे मापन करण्यात येते. यात‎ हद्दी निश्‍चित केल्यानंतर बिनशेती,‎ ले-आऊट, भूसंपादन, भूप्रदान‎ आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख‎ तयार केले जातात. आजवर या सर्व‎ प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरिक‎ पद्धतीत पार पाडल्या जातात.‎ यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ‎ तर लागतेच पण अनेक ठिकाणी‎ झाडी-झुडपी, डोंगरदऱ्या यामुळे‎ जमीन मोजणीत मोठ्या अडचणी‎ येत होत्या. रोवर यंत्रांमुळे जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहे.

रोवर मशीनमुळे मोजणी करतांना  येणार अचूकता आणि पारदर्शकता

रोव्हर मशीनमुळे तास किंवा काही मिनिटाच्या आत मोजणी काम करता येते. मागील वर्षांपासून आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन (DPDC) मार्फत  हे मशिन भूमी अभिलेख विभागाला उपलब्ध करून दिले आहेत. या मशीनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते. अचूकता आणि पारदर्शकता ही या यंत्राची वैशिष्ट्ये आहेत. या मशिनच्या सहाय्याने मोजणी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. रोवर मशीनमुळे तासांमध्ये किंवा काही मिनिटातच या मशीनद्वारे जमिनीची मोजणी करता येते.

प्रास्ताविकात  जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर यांनी योजनेची माहिती विशद करून होणारे फायदे सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  उप अधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे यांनी केले. तर आभार  पी. एस.पाटील , नगर भुमापन अधिकारी यांनी मानले.

या कार्यक्रमाला मनोज चव्हाण, रतिलाल शिरसाठ, नुपम मेढे, कृष्णा भट, संजय सोनार, रोहिदास चव्हाण, विजय पाटील, रवींद्र महाजन, सुरेश वाडे  प्रशांत कोळेकर, गोपाळ पाटील रवींद्र कदम, जिल्ह्यातील अन्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १४ : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा प्रति कुलपती हसन मुश्रीफ यांनी केल्या.

नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सन 2024 मधील अधिसभेच्या प्रथम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दूरदृश्य सवांद प्रणालीद्वारे त्यांनी संवाद साधला.

यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, प्र.कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांच्यासह सर्व अधिसभा सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, संशोधन आणि आरोग्य शिक्षणाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे. या दृष्ट‍िकोनातून विद्यापीठाने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हा नवीन विभाग सुरु केला असून नुकतेच त्याचे उ‌द्घाटन झाले आहे. तसेच विविध परदेशी विद्यापीठ व संस्थासमवेत सामंजस्य करार केले असून ऑस्ट्रेलियन विद्यापीठासमवेत विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविण्याकरिता विद्यापीठाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत ‘अॅकॅडमिक डायलॉग’ हा दोन दिवसीय कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित केला. यामुळे विद्यापीठ शिक्षण व आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर वेगळी ओळख निर्माण करेल.

विद्यापीठाकडून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, नॅक मानांकनाकरीता नॅक्सेलचा प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच विहित वेळेत निकल जाहीर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून अत्यंत कमी वेळात निकाल घोषित करण्यात येतो, याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी विद्यापीठाचे कौतुक केले.

अध्यापन, संशोधन, विस्तार, सेवा याद्वारे ज्ञान व बुध्दिमत्ता यांचा प्रसार निर्मिती व जपणूक करणे व समाज जीवनावर परिणामकारक प्रभाव पाडणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन आरोग्य सेवा देणारा विद्यार्थी घडविण्याच्या अनुषंगाने तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य विद्यापीठाचा लौकिक आणखी वाढविण्यासाठी अधिसभेने उर्वरीत ४ वर्षामध्ये योग्य ती वाटचाल करावी. विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयामध्ये अधिसभा ही मोलाची भूमिका बजावत असते. विद्यापीठाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी अधिसभेची असते. त्यामुळे विद्यापीठास मार्गदर्शन करण्याचे काम ही अधिसभा करेल, असे त्यांनी सांगितले.

कुलपती कार्यालयाने यावर्षीचा ‘आविष्कार २०२३-२४’ हा राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन प्रकल्प महोत्सव आयोजित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सोपविली व त्यांनी ती समर्थपणे व उत्कृष्टरीत्या पार पाडली याकरीता विद्यापीठाचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

पदरवाडी गावच्या पुनर्वसनसाठी तत्वतः मान्यता  – मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. १४: खेड तालुक्यातील पदरवाडी गावाचे पुनर्वसन करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात येत असून या गावच्या पुनर्वसनासाठी  जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही  करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पदरवाडी गावचे पुनर्वसन करणेबाबत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात बैठक झाली. आमदार दिलीप मोहिते, पुणे विभागीय उपायुक्त रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी पुणे ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे तहसिलदार प्रशांत बेडसे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे, सहसचिव सत्यनारायण बजाज, अपर तहसीलदार स्नेहा शिंदे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, पदरवाडी गावाच्या कायम स्वरुपी पुनर्वसनास भूसंपादन व अन्य बाबींसाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल. या गावाचे पुनर्वसन होईपर्यंत पावसाळा व आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतरासह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

टंचाईच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक 14 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : आगामी काळातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच सर्व विभागामार्फत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्या. येवला येथे विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

संपर्क कार्यालयात आयोजित या बैठकीस येवला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, तहसीलदार आबा महाजन, निफाड तहसिलदार विशाल नाईकवाडे,  येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, गटविकास अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, कार्यकारी अभियंता नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभाग एम. बी. ढोकचोळे, उपविभागीय अभियंता पुणेगाव कालवा उपविभाग यो. अ. घुगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, जलस्त्रोतातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या जून २०२४ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे प्राधान्याने नियोजन करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत ५१ गावे व १५ वाड्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तेथील साठवण विहिरी अधिग्रहीत करून रोटेशननुसार गावनिहाय पाणीवाटप सुरळीत कसे राहील याबाबत अधिकारी यांनी दक्ष रहावे. तसेच उपलब्ध पिण्याच्या पाणीसाठ्यातून  पाण्याचा अतिरीक्त वापर शेतीसाठी होणार नाही, याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी. तसेच शासकीय टँकर्स भरण्यासाठी थ्री फेज वीजपुरवठा दिवसा सुरळीत ठेवण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, शासनाकडून प्राप्त झालेली ६३ कोटींची दुष्काळी मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी. पीक विम्याच्या मदतीचे वाटप सुद्धा शेतकऱ्यांना करण्यात यावे. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम पावसाळ्याच्या आत पूर्ण करावे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व कामगारांची संख्या वाढवून जलद गतीने काम करण्यात यावे. शिवसृष्टी प्रकल्पांतर्गत पुढील टप्प्यातील कामांसाठीचे आवश्यक ड्रॉईंग प्राप्त करून कामाला अधिक गती देण्यात यावी. रेशन कार्ड अपडेशनची प्रकरणे मार्गी लावण्यात यावीत. लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी १०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिले.

अडतीस गावे पाणी पुरवठा योजना, राजापूर सह ४१ गावे पाणी पुरवठा योजना, धुळगावसह १७ गावे पाणी पुरवठा योजना, लासलगावसह १६ गावे पाणी पुरवठा योजनेची सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ पात्र लाभार्थींना त्वरित देण्यात यावा, अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

बैठकीत सावरगाव साठवण (ल.पा.) तलाव कामे, लासलगाव बाह्य वळण कामे, येवला शहर पिण्याच्या पाण्याची स्थिती, मनरेगा – पांदण रस्ता व इतर मंजूर कामांची सद्यस्थिती, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, येवला शहरातील स्वच्छता आढावा बैठकीत घेण्यात आला.

एकही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही

या बैठकीत विविध घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला. समाजातील प्रत्येक पात्र वंचित घटकाला घरकुल योजनांच्या निकषात बसवून घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. त्यांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यात यावीत. यामध्ये एकही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

महिला बचतगटांना व्यवसाय कर्ज धनादेश वितरण

येवला नगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या सूक्ष्म व लघु प्रक्रिया उद्योग योजनेतून येवला शहरातील ४ महिला बचतगटांना व्यवसायासाठी अल्प व्याजदराने एकूण १७ लक्ष रुपयांच्या मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १४ : पनवेल, कल्याण, डोंबिवली या शहरांत काही ठिकाणी शाळा परिसरात बार व मद्य विक्री सुरू असल्यास संबंधीत ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

मंत्रालयातील दालनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण व पनवेलसह रायगड येथील स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे, रायगड जिल्हा अधीक्षक श्री. कोल्हे उपस्थित होते.

शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, बस स्थानक, राष्ट्रीय महामार्गाच्या 75 मीटर अंतराच्या परिसरात हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मद्य विक्रीस बंदी असल्याचा नियम आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीरपणे मद्य विक्री होऊ देऊ नये. विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी आणि बेकायदेशीरपणे व नियम डावलून सुरू असणाऱ्या बार व हॉटेलवर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या. तसेच, कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

निर्देश दिल्यानंतर तत्काळ ठाणे व रायगड जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन कारवाई करत असून यातून राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांची कार्यतत्परता व संवेदनशीलता दिसून आली.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शुरविरांचे स्मरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.14 (जिमाक) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शुरविरांमुळे हा महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. अजूनही आपले शुर सैनिक देशाच्या सिमेवर देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्रपणे काम करत असतात. प्रसंगी आपले प्राण देखील गमावतात. अशा सर्व विरांचे स्मरण करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार व कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, प्रकाश देशपांडे, रुपाली बेहरे, तहसिलदार निकेता जावरकर उपस्थित होते.

स्वातंत्र्य लढ्यात अनेक शुर विर सहभागी झाले होते. आपल्या प्राणांची पर्वा न करता मातृभूमिच्या रक्षणासाठी या विरांनी शेवटच्या श्वासापर्यंत परकीय सत्तेशी लढा दिला. अजूनही देशाच्या सिमा सुरक्षित ठेवण्यासाठी देशाचा प्रत्येक सैनिक आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत असल्याचे आपण पाहतो. या सैनिकांमुळेच आपण शांतपणे सुखाची झोप घेऊ शकतो. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाला समोर जाण्यासाठी आमचे शुर विर सैनिक सदैव तत्पर असतात.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणाऱ्या शुरविरांचे स्मरण करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शुरविरांना वंदन, नमन, स्मरण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. आपल्या जिल्ह्याचा देखील स्वातंत्र्य लढ्यात फार मोठा सहभाग राहिला आहे. स्वातंत्र्याच्या प्रत्येक चळवळीत जिल्ह्याने योगदान दिले आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांनी स्वातंत्र्यासाठी सैनिकांचे फार मोठे योगदान आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना सैनिक व त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत, असे सांगितले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी केले. त्यांनी सत्कार कार्यक्रमाच्या आयोजनामागणी भूमिका यावेळी मांडली.

यावेळी पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाभरातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे यांनी केले तर आभार उपजिल्हाधिकारी रुपाली बेहरे यांनी मानले.

000

विकासकामांसाठी निधी उपलब्ध, कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक 14 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा : तालुक्यासह गावातील विकासाच्या विविध कामांसाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करण्यात आलेली आहे. आज भूमिपूजनासह सुरू झालेली विकासाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.

निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद व वाकद येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील, शिरवाडे वाकदचे सरपंच डॉ. श्रीकांत आवारे, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, वाकदच्या सरपंचा नलिनी गांगुर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, आज शिरवाडे वाकद व मौजे वाकद येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले आहे. या विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांना मुलभूत सोयी – सुविधा उपलब्ध होणार आहे. यासह नवीन शिधापत्रिकाधारकांनाही त्वरेने शिधापुरवठा केला जाणार असून वंचित नागरिकांनाही नवीन कोट्यातून शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सार्वजनिक कामांमध्ये नागरिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी याप्रसंगी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, शासनाने विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. यात रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज या व अशा २२ पायाभूत विकास क्षेत्रातील प्रकल्प राबविण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळामार्फत अॅन्युईटी योजना भाग २ अंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात आले आहेत. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ मधील १० हजार किलोमीटर रस्त्यांव्यतिरिक्त आणखी ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान १ लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषि पंप ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. या योजनेअंतर्गत ८ लाख ५० हजार नवीन सौर कृषी पंप बसविण्यात येत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत ८४ लाख ५७ हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी १ हजार ६९१ कोटी ४७ लाख रुपये अनुदान प्रदान करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या ४४ लाख ८२ हजार शेतकऱ्यांना ३ हजार ८२५ कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना, दरवर्षी १२ हजार रुपये इतकी एकूण रक्कम देण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये आता शासकीय दस्तावेजावर आईचे नाव बंधनकारक केले आहे. पोलीस पाटील यांच्याही मानधनात भरीव वाढ करून आता महिन्याला १५ हजार इतके मानधन मिळणार आहे. आशा सेविकांच्या मानधनात पाच हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल त्यांना  महिना ६ हजार रूपये निवासी भत्ता मिळणार आहे. त्याचप्रमाणे इतर मागासवर्ग, निरधिसूचित जमाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी पुढील तीन वर्षांत १० लाख घरे बांधण्यासाठी, राज्यात मोदी आवास गृहनिर्माण योजना राबवित आहे. या योजनेअंतर्गत, १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दिव्यांगांनाही खास घरे बांधून मिळणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात ३४ हजार ५०० दिव्यांगांना रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना व मोदी आवास योजनेंतर्गत घरे मिळणार आहेत. महिला सक्षमीकरण अंतर्गत १ लाख महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात येणार आहे. महात्मा फुले शेतकरी  कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या १४ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५ हजार कोटी रूपयांचे वितरण कर्ज खात्यावर करण्यात आले आहे. १४ कोटी रूपयांचा निधी लासलगाव उपजिल्हा रूग्णालयाच्या नूतनीकरणासाठी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरणासाठी साडे अकरा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व गुढीपाडवा  सणांना  पावणेदोन कोटी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

शिरवाडे वाकद येथील या कामांचे आज झाले भूमिपूजन व लोकार्पण :
१) जलजीवन योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजना लोकार्पण. (र. रु. १३ कोटी)
२) खेडलेझुंगे कोळगांव कानळद शिरवाडे वाकद रस्‍ता (प्रजिमा १०५) किमी ९/०० ते १४/७००, १९/३०० ते २१/८०० ची सुधारणा करणे ता. निफाड जि. नाशिक पैकी भाग रामा-७ ते शिरवाडे वाकद याचे लोकार्पण. (सा.बां.) (र. रु.  २५६.५० लक्ष)
३) अनु. जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेअंतर्गत संविधान सभागृह बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (र. रु. १२ लक्ष)
४) जिल्‍हा परिषद शाळेस संरक्षक भिंत बांधणे (MREGS अंतर्गत) उद्धाटन (र. रु.८.५० लक्ष)
५) जिल्‍हा क्रीडा विभाग अंतर्गत ग्रीन जिम करणे उद्घाटन. (र. रु. ५ लक्ष)
६) जनसुविधा योजनेंतर्गत स्‍मशानभूमी अनुषंगिक कामे करणे लोकार्पण (र. रु. १० लक्ष)
७) अनु. जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे अंतर्गत रस्‍ता काँक्रिटीकरण लोकार्पण (र.रु. ५ लक्ष)
८) ठक्‍करबाप्‍पा आदिवासी विकास योजनेंतर्गत प्रभावती नगर अंतर्गत रस्‍ता कॉंक्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन. (र. रु. १५ लक्ष)
९) रामा-७ ते शिरवाडे वाकद ते तालुका हद्द रस्‍ता (प्रजिमा १०५) किमी २१/०० ते २४/०० रस्‍त्‍याची सुधारणा करणे ता. निफाड कामाचे भूमिपूजन. (सा.बां.) (र. रु..२५० लक्ष)
१०) स्‍वच्‍छ भारत निगम अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधणे लोकार्पण. (अं.किं. ४.६० लक्ष)
११) ग्रामपंचायत स्तर 15 वा वित्‍त आयोग योजने अंतर्गत जि. प. शाळा पाण्‍याची टाकी बांधकाम कामाचे भूमिपूजन. (र. रु. १.४१ लक्ष)
१२) ग्रामपंचायत स्‍तर १५ वा वित्‍त आयोग योजने अंतर्गत पाण्‍याची टाकी बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन. (र. रु. ३.९० लक्ष)
१३) ग्रामपंचायत स्‍तर १५ वा वित्‍तआयोग योजने अंतर्गत २१ खोल्‍या बेघर वस्‍ती भुमीगत गटार करणे कामाचे भूमिपूजन. (र. रु. ३.२८ लक्ष)
१४) ग्रामपंचायत स्‍तर १५ वा वित्‍त आयोग योजने अंतर्गत प्रभावती नगर वाकद रोड सोलर स्ट्रिट लाईट बसविणे लोकार्पण. (र. रु. १.६४ लक्ष)
१५) शिरवाडे वाकद ता. निफाड येथे मूलभूत सुविधा (२५१५)  योजनेंतर्गत गोरक्ष मंदिर परिसरात सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन. (र. रु. १५ लक्ष)
१६)  शिरवाडे वाकद ता. निफाड येथे मूलभूत सुविधा (२५१५) योजनेंतर्गत मराठी शाळा ते कुर्ला नाल्‍यापर्यंत नाला मजबुतीकरण करणे कामाचे भूमिपूजन. (र. रु.१० लक्ष)
१७) शिरवाडे वाकद ता. निफाड येथे अनु. जाती वस्‍तीमध्‍ये सामाजिक न्‍याय अंतर्गत रस्‍ता काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण. (र. रु. १० लक्ष)
१८) शिरवाडे वाकद ता. निफाड येथे मूलभूत सुविधा  (२५१५) योजनेंतर्गत सामाजिक सभागृह लोकार्पण. (र. रु. १० लक्ष)
१९) शिरवाडे वाकद ता. निफाड येथे सामाजिक न्‍याय अंतर्गत अनु. जाती व नवबौद्ध वस्तीमध्‍ये संविधान सभागृ‍ह बांधणे कामाचे भूमिपूजन. (र. रु. २० लक्ष)

 वाकद (ता. निफाड) येथील या कामांचे आज झाले भूमिपूजन व लोकार्पण :
१) जलजीवन मिशन अंतर्गत पाण्‍याची टाकी बांधणे लोकार्पण (र. रु. ५३.५० लक्ष)
२) जनसुविधा योजनेंतर्गत मुस्लिम कब्रस्‍तान बांधणे लोकार्पण (र. रु. १० लक्ष)
३) ठक्‍कर बाप्‍पा योजनेंतर्गत लक्ष्‍मी माता मंदिरासमोर सभागृह बांधणे कामाचे लोकार्पण (र. रु. १२.५० लक्ष)
४) मूलभूत सुविधा योजनेंतर्गत देवगांव फाटा येथे बिरोबा मंदिराजवळ सभागृह बांधणे लोकार्पण.(र. रु. १५ लक्ष)
५) जनसुविधा योजनेंतर्गत स्‍मशानभूमी शेड व पेव्हर ब्‍लॉक बसविणे कामाचे लोकार्पण  (र. रु.१० लक्ष)
६) ठक्‍करबाप्‍पा आदिवासी विकास योजनेंतर्गत आदिवासी वस्‍तीत रस्‍ता काँक्रिटीकरणे कामाचे लोकार्पण (र. रु. ८ लक्ष)
७) वाकद ता. निफाड येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन. (र. रु. ३० लक्ष)
८) वाकद ता. निफाड येथे सामाजिक न्‍याय अंतर्गत अनु. जाती वस्‍तीमध्‍ये रस्‍ता काँक्रिटीकरण करणे कामाचे लोकार्पण. (र. रु. १० लक्ष)
९) वाकद गाव ते जुना वाकद फाटा स्‍थानिक विकास निधी अंतर्गत रस्‍ता काँक्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन (र. रु. १९.६९ लक्ष)
१०) वाकद ता. निफाड येथे स्‍थानिक विकास निधी अंतर्गत खंडेराव महाराज मंदिरासमोर सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन. (र. रु. १५ लक्ष)
११) वाकद ता. निफाड येथे मूलभूत सुविधा योजनेंतर्गत वाकद देवगाव फाटा बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन. (र. रु. १५ लक्ष)
00000

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारागृहातून बंद्यांना राज्यमाफी

मुंबई, दि. १४ : केंद्र सरकारच्या धोरणानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशिष्ट प्रवर्गातील व विहीत निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षा बंद्यांना शिक्षेत राज्यमाफी देण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच बंद्यांची मुदतपूर्व मुक्तता होऊन, ते आपल्या कुटुंबात गेले आहेत. कारागृहातील चांगली वागणूक हा राज्यमाफी या योजनेचा मूलभूत निकष आहे. कारागृहात असताना वर्तनात सुधारणा करून कारागृहातून मुक्त होण्याच्यादृष्टीने बंद्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे कारागृहाचे ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरले आहे.

माफी देताना प्रत्येक बंदीच्या साधारण माफी अधिक विशेष माफी, ही त्याच्या पूर्ण अथवा शिक्षा कालावधीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त होणार नाही, याची कारागृह प्रशासनाला दक्षता घ्यावयाची आहे. जन्मठेपेची शिक्षा किंवा देहांत शिक्षा फौजदारी दंड प्रक्रियेतील कलम 433 अन्वये जन्मठेपेच्या शिक्षेत रूपांतरीत करण्यात आली असल्यास आणि निव्वळ 14 वर्षांची कारागृहीन शिक्षा भोगली असल्यास अशा बंद्यांना राज्यमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्या जन्मठेप बंद्यांच्या प्रकरणांचा समावेश फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 433 (अ) मध्ये होत नाही, अशा बंद्यांना या राज्यमाफीचा लाभ, त्यांची निव्वळ 10 वर्षे शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहे. तसेच राज्यमाफी आदेशाचा दिनांक व त्यापूर्वी न्यायालयामार्फत जामीन मंजूर केलेल्या बंद्यांनाही या राज्यमाफीचा लाभ मिळणार  आहे.

संचित किंवा अभिवचन रजेवर असलेल्या शिक्षा बंद्यांना राज्यमाफीचा लाभ लागू असणार आहे. मात्र अनधिकृतपणे कारागृहाबाहेर असलेल्या बंद्यांना राज्यमाफी देण्यात येणार नाही. माफी पुस्तकावर परत घेण्यात आलेल्या अथवा सर्वसाधारण माफीसाठी पात्र असलेल्या बंद्यांना ही राज्यमाफी देय राहील. तर फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम 106 ते 110 अंतर्गत कारागृहात असलेले बंदी, भारतीय दंड संहितेमधील कलम 121 ते 130 अंतर्गत शिक्षा झालेले बंदी, केंद्रीय अधिनियमान्वये शिक्षा झालेले बंदी, मोक्का व पोस्को कायदा अंतर्गत शिक्षा झालेले बंदी, दहशतवादी कारवायांमध्ये समाविष्ट बंदी, संचित रजेकरीता अपात्र ठरणारे बंदी, दिवाणी बंदी, किशोर सुधारालयातील मुले, कारागृहातील वर्तन बेशिस्तीचे किंवा असमाधानकारक असलेले बंदी यांना ही राज्यमाफी लागू असणार नाही.  याबाबतचा शासन निर्णयही निर्गमीत झाला आहे.

शिक्षा कालावधीनुसार अशी असेल राज्यमाफी

शिक्षेचा कालावधी एक महिना किंवा तीन महिन्यापेक्षा कमी असल्यास राज्यमाफी पाच दिवस, तीन महिने किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी असल्यास राज्यमाफी एक महिना, सहा महिने किंवा एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तीन महिने, एक वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा कमी असल्यास राज्यमाफी चार महिने, दोन वर्ष किंवा तीन वर्षापेक्षा कमीसाठी पाच महिने, तीन वर्ष किंवा चार वर्षापेक्षा कमी कालावधीकरीता सहा महिने, चार वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा कमी असल्यास सात महिने, पाच वर्ष किंवा सहा वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी आठ महिने, सहा वर्ष किंवा सात वर्षापेक्षा कमी असल्यास नऊ महिने, सात वर्ष किंवा आठ वर्षापेक्षा कमी कालावधीकरीता दहा महिने, आठ वर्ष किंवा नऊ वर्षापेक्षा कमी असल्यास अकरा महिने, नऊ वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी बारा महिने, दहा वर्ष किंवा अकरा वर्षापेक्षा कमी कालावधीकरीता तेरा महिने, अकरा वर्ष किंवा अकरा वर्षापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा असल्यास राज्यमाफी  चौदा महिने, तर जन्मठेपेसाठी राज्यमाफी पंधरा महिने असणार आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ/

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/03/अमृत-महोत्सव-राज्य-माफी-1.pdf” title=”अमृत महोत्सव राज्य माफी”]

शिराळ्यातील छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकासासाठी १३ कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर

नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी

मुंबई, दि. १४ : स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यास राज्य शासनाच्या शिखर समितीची मान्यता मिळाली असून नियोजन विभागाने त्यासाठी १३ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना कोकणात अटक करुन पुण्याला नेत असताना, मोगलांच्या ताब्यातून त्यांची सुटका करण्यासाठी स्वराज्याच्या मावळ्यांनी शिराळा येथे दिलेल्या धाडसी लढ्याची माहिती यानिमित्ताने भावी पिढीपर्यंत पोहचेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील वढु-बुद्रुक येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ स्मारकाचे तसेच हवेली तालुक्यातील मौजे तुळापूर येथील बलिदानस्थळ आणि परिसराच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. त्याच धर्तीवर सांगली तालुक्यातील शिराळा स्मृतीस्थळ विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत सातत्याने बैठका घेऊन त्यांनी यासंदर्भातील कार्यवाही त्वरेने करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार स्मृतीस्थळ विकास आराखडा तयार करुन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिचीची त्यास मान्यता घेण्यात आली व 13 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून 31 मार्च 2026 पर्यंत त्यांना सर्व विकासकामे पूर्ण करायची आहेत.

या स्मृतीस्थळाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यरक्षणाच्या लढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर इथे कैद करुन पुण्याकडे नेले जात असताना त्यांची मोगलांच्या ताब्यातून सुटका करण्याचा साहसी प्रयत्न शिराळ्यातल्या भुईकोट किल्ला परिसरात झाला होता. स्वराज्याच्या मावळ्यांना त्यात यश आले नसले तरी स्वराज्याच्या लढ्यातला तो देदिप्यमान अध्याय आहे. तो अध्याय जपण्याचा, त्या लढ्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न शिराळा स्मृतीस्थळ विकास आराखड्याच्या अंमलबजावणीतून करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/03/शिराळा-शा.नि.-1-1.pdf” title=”शिराळा शा.नि. (1)”]

०००

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...